|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 21 वर्षांनी जयललितांच्या निवासस्थानी प्राप्तिकरचे छापे

21 वर्षांनी जयललितांच्या निवासस्थानी प्राप्तिकरचे छापे 

चेन्नई / वृत्तसंस्था

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या नजीकच्या सहकारी व्ही.के. शशिकला यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांनी 21 वर्षांनी दिवंगत जयललितांच्या निवासस्थानी पोस गार्डनवर छापे टाकले. या घरात सध्या शशिकलांचे कुटुंबीय वास्तव्य करू आहेत.

छाप्याच्या कारवाईवेळी शशिकलांच्या खोलीतून लॅपटॉप, डेस्कटॉप आणि काही पेन ड्राईव्ह हस्तगत झाल्याची माहिती समोर आली. शशिकला सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. 1996 नंतर पहिल्यांदाच अण्णाद्रमुकच्या माजी अध्यक्षा जयललितांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला. जया टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शशिकलांचे भाचे विवेक जयरामन यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यादरम्यान जयललितांचे खासगी सचिव पूनगुंद्रन यांच्या खोलीची देखील झडती घेण्यात आली.

छापे टाकण्यात आल्याची माहिती समजताच अण्णाद्रमुकचे समर्थक निवासस्थानाच्या नजीक जमू लागले. यामुळे तेथे अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले. यादरम्यान टीटीव्ही दिनाकरन यांच्या अनेक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील एका समर्थकाने आत्मदहनाची धमकी दिली होती.

टीटीव्ही दिनाकरन यांनी ट्विट करत कारवाईला जयललितांच्या स्वप्नांवरील हल्ला ठरविले. मुख्यमंत्री पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री पन्नीरसेल्वम स्वतःची सत्ता कायम राखण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात असा आरोप त्यांनी केला. या अगोदर देखील प्राप्तिकर विभागाने शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या देशभरातील 187 मालमत्तांवर छापे टाकले होते.

Related posts: