|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » नाभिक बांधवांचा भव्य मूक मोर्चा

नाभिक बांधवांचा भव्य मूक मोर्चा 

मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी : निवेदनाद्वारे केली मागणी : अन्यथा आंदोलन तीव्र

प्रतिनिधी / ओरोस:

नाभिक समाजाबाबत टीकात्मक वक्तव्य करून समाजाचा अपमान केल्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करीत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांनी या समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन तीव्र करून थेट मंत्रालयावरच मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

 पुणे जिल्हय़ातील दैंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखाना येथे झालेल्या एका सभेत नाभिक समाजाच्या व्यवसायाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अनुद्गार काढल्याचा आरोप करीत नाभिक समाजाबद्दल अशा प्रकारे टीकात्मक वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्यावतीने राज्य उपाध्यक्ष विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दुपारी 12 वाजता शेकडो नाभिक समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

मागील सरकारने कशा पद्धतीने योजना अपूर्ण ठेवून नवीन योजना सुरू केल्या, याबाबतचा दाखला देताना मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाबद्दल अनुद्गार काढल्याचे सांगून संपूर्ण समाजाची ही अवहेलना असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.  या मोर्चात जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण, नितेश पिंगुळकर, किशोर पिंगुळकर, महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, आनंद पिंगुळकर, राकेश लाड, अरुण अणावकर, शेखर पिंगुळकर यांच्यासह शेकडो नाभिक समाजबांधव सहभागी झाले होते. समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात, यासाठीचे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्याकडे सुपुर्द केले. मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

नाभिक समाज हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. मुख्यमंत्र्यांनी या समाजाची अवहेलना करून बारा बलुतेदारांना दुखावले आहे. त्यामुळे जाहीर माफी न मागितल्यास बारा बलुतेदार संघटनाही या लढय़ात उतरणार असल्याचे विजय चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related posts: