|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तेर्सेबांबर्डेत टेम्पो झाडाला आदळून भीषण अपघात

तेर्सेबांबर्डेत टेम्पो झाडाला आदळून भीषण अपघात 

कोल्हापूरचा चालक जागीच ठार

शनिवारी पहाटेची घटना

बिसलेरी बाटल्या घेऊन कणकवलीला चालला होता

वार्ताहर / कुडाळ:

मुंबई-गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे बसथांब्यानजीक गोव्याहून कणकवलीच्या दिशेने भरधाव वेगात जाणारा आयशर टेम्पो झाडाला आदळून भीषण अपघात झाला. यात आयशर चालक रुपेश राजाराम ओतारी (42, सध्या रा. कोल्हापूर, मूळ रा. सांगली) जागीच ठार झाले. आत अडकलेला त्यांचा मृतदेह एक तासानंतर बाहेर काढण्यात आला. ही घटना शनिवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात आयशरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.

रुपेश ओतारी आपल्या ताब्यातील आयशर घेऊन गुरुवारी गोवा येथे गेले होते. शुक्रवारी सायंकाळी वेर्णा-गोवा येथील बिसलेरी इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीतून आयशरमध्ये बिसलेरी बाटल्या भरल्या. नंतर रात्री ते कणकवलीच्या दिशेने यायला निघाले. कणकवली येथील भक्ती एंटरप्रायजेस येथे ते माल उतरविणार होते. मात्र, महामार्गावर तेर्सेबांबर्डे-मळावाडी बसथांब्यानजीक आयशर रस्त्याच्या बाहेर जात भरधाव वेगात आईनच्या मोठय़ा झाडाला आदळ उलटला. शनिवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची शक्यता आहे.

यात आयशरचा दर्शनी भाग जोराच्या धडकेने आत दाबला जात अक्षरश: चक्काचूर झाला. चालक रुपेश आतमध्ये अडकून जागीच ठार झाले. धडकेनंतर आयशरच्या हौद्यातील बिसलेरीचे भरलेले खोके केबिनच्या वरून बाहेर फेकले गेले आणि बिसलेरी बाटल्यांचा खच साधारण पन्नास ते साठ फुटांपर्यंत पसरला.

अपघात झाल्याचे सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास तेथील ग्रामस्थांनी पाहिले. तेव्हा त्यांना चालकाचे डोके दिसले. कुडाळ पोलिसांना याबाबत कल्पना देताच हवालदार पी. सी. धोत्रे व प्रशांत कासार यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. येथील संजीवनी एंटरप्रायजेसचे चंदू कदम तसेच पिंटय़ा सुगणे, महामार्ग चौपदरीकरण एजन्सीचे कामगार आणि तेथील जीजबा सावंत, मंगेश कानडे, रफिक व अन्य ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढण्यास पोलिसांना सहकार्य पेले. आत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी कटर व जेसीबीचा वापर करण्यात आला.

सुखदेव महादेव पाटील (रा. कोल्हापूर) यांच्या मालकीचा हा आयशर असून तीन महिन्यांपूर्वी त्यांनी तो खरेदी केला आहे. रुपेश आठ दिवसांपासून त्यांच्याकडे कामाला होते. सध्या ते कोल्हापूर-उत्तरेश्वर पेठ येथे आपल्या सासुरवाडीला कुटुंबासह राहायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.

Related posts: