|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राफेल : राहुल गांधींनी विचारले 3 प्रश्न

राफेल : राहुल गांधींनी विचारले 3 प्रश्न 

संरक्षणमंत्री, पंतप्रधान मोदींना केले लक्ष्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढविला. राहुल यांनी ट्विट करत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांना 3 प्रश्न विचारले. पॅरिसमध्ये राफेल खरेदी करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या घोषणेवर देखील त्यांनी तांत्रिक प्रश्न उपस्थित केला. राहुल यांच्यासमवेत माकप नेते सीताराम येचुरी यांनी देखील राफेल व्यवहारावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला.

तुमचे बॉस तुम्हाला गप्प बसवित आहेत, हे किती लाजिरवाणे आहे, संरक्षण मंत्र्यांनी कृपया प्रत्येक राफेल विमानाची अंतिम किंमत सांगावी असे म्हणत राहुल यांनी सीतारामन यांना लक्ष्य केले. दुसरा प्रश्न राहुल यांनी पंतप्रधान मोदींशी जोडून विचारला. पंतप्रधानांनी पॅरिसमध्ये राफेल विमान खरेदी करण्याच्या घोषणेअगोदर मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची अनुमती घेतली होती का अशी विचारणा राहुल यांनी ट्विटद्वारे केली. राफेल व्यवहारातून हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडला वगळण्याबद्दल राहुल यांनी तिसरा प्रश्न विचारला. पंतप्रधानांनी एचएएला बाजूला सारून संरक्षण उद्योगाचा कोणताही अनुभव नसलेल्या उद्योजकाला हा व्यवहार का मिळवून दिला अशी विचारणा त्यांनी केली.

या अगोदर देखील त्यांनी राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारावरून मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधानांनी एका उद्योजकाला लाभ मिळवून देण्यासाठी पूर्ण व्यवहारात कथित बदल केल्याचा आरोप त्यांनी केला, परंतु केंद्र सरकारने काँग्रेस आणि राहुल यांचे आरोप खोडून काढले होते.

राफेलसाठी अगोदरचा व्यवहार (126 विमानांचा व्यवहार जो रद्द करण्यात आला) आणि नव्या व्यवहारातील किंमत जाहीर केली जावी. 36 राफेल विमानांच्या खरेदीत तंत्रज्ञानाचे हस्तांतरण का केले जात नाही, हेच पंतप्रधान मोदींचे मेक इन इंडिया आहे का असा प्रश्न माकप महासचिव येचुरी यांनी उपस्थित केला.

Related posts: