|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पद्मावतीच्या खासगी स्क्रीनिंगमुळे सेन्सॉर प्रमुख नाराज

पद्मावतीच्या खासगी स्क्रीनिंगमुळे सेन्सॉर प्रमुख नाराज 

सेन्सॉर मंडळाची प्रक्रिया संपविण्याचा प्रयत्न :

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 वादात सापडलेला चित्रपट पद्मावतीचे खासगी स्क्रीनिंग करण्यात आल्याने आता सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन नाराज झाले. चित्रपट निर्मात्यांनी खासगी स्क्रीनिंग करणे चुकीचे असल्याचे सेन्सॉर बोर्डाने म्हटले. शुक्रवारी काही पत्रकारांसाठी या चित्रपटाचे विशेष प्रदर्शनपूर्व स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते.

सेन्सॉर मंडळाने आतापर्यंत चित्रपट पाहिलेला नाही तसेच याला प्रमाणपत्र देखील देण्यात आलेले नाही. परंतु चित्रपटाच्या निर्मात्यांकडून खासगी खेळ ठेवला जाणे आणि राष्ट्रीय वाहिन्यांवर चित्रपटाचे समीक्षण करणे अत्यंत खेदजनक असल्याची प्रतिक्रिया सेन्सॉर प्रमुख प्रसून जोशी यांनी व्यक्त केली. एकीकडे चित्रपट प्रदर्शनाच्या प्रक्रियेत वेग आणण्याकरता सेन्सॉर मंडळावर दबाव टाकला जातोय, तर दुसरीकडे मंडळाच्या प्रक्रियेलाच संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जोशी यांनी केला.

अपुरे दस्तऐवज

पद्मावतीच्या समीक्षेचा अर्ज चालू आठवडय़ातच प्राप्त झाला. जमा केलेली कागदपत्रे अपूर्ण असल्याचे निर्मात्यांना माहिती आहे. चित्रपट काल्पनिक आहे का ऐतिहासिक याचा उलगडा कागदपत्रांद्वारे होत नाही. कागदपत्रे अपुरी असल्याने सेन्सॉरने निर्मात्यांना उर्वरित गोष्टी उपलब्ध करण्यास सांगितले. तरीही सेन्सॉरवरच चित्रपटाच्या प्रमाणनावर विलंब केल्याचा असल्याचा आरोप होणे हैराण करणारे असल्याचे जोशी म्हणाले.

खासगी, सार्वजनिक प्रदर्शनात अंतर

पद्मावतीच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन काही निवडक व्यक्तींसाठी केले. हा प्रकार चुकीचा आहे. चित्रपटाच्या खासगी आणि सार्वजनिक प्रदर्शनात अंतर असते. प्रमाणपत्र नसताना चित्रपट दाखविणे गैर असल्याचे सेन्सॉरच्या एका पदाधिकाऱयाने म्हटले.

चित्रपटाबद्दलचे आक्षेप

राजस्थानात करणी सेना, भाजप नेते आणि हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप केला.

चित्रपटात राणी पद्मिनी आणि खिलजी यांच्यात दृश्य दाखविण्यात आल्याने भावना दुःखावल्याचे राजपूत करणी सेनेचे मानणे आहे. चित्रपट प्रदर्शित करण्याअगोदर तो राजपूत प्रतिनिधींना दाखविला जावा अशी मागणी करणी सेनेने केली.

Related posts: