|Saturday, January 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 6 दहशतवाद्यांचा खात्मा एक कमांडो हुतात्मा

6 दहशतवाद्यांचा खात्मा एक कमांडो हुतात्मा 

काश्मीरमधील बांदिपोरा भागात तुंबळ चकमक

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरमधील बांदिपोरा येथे शनिवारी दुपारच्या सुमारास दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये तुंबळ चकमक झाली. या चकमकीत सहा दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. मात्र, यावेळी झालेल्या संघर्षात भारतीय हवाई दलाच्या एक कमांडो हुतात्मा झाला. तसेच अन्य दोन लष्करी जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लष्करी इस्पितळात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या चकमकीनंतर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून संशयित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

बांदिपोरा येथील हाजिन परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याचा सुगावा सुरक्षा यंत्रणांना गेल्या दोन दिवसांपासून लागला होता. त्यानुसार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली. लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्ससह विशेष कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, हवाई दलातील गरुड कमांडो पथक आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने या भागात संयुक्तपणे शोधमोहीम राबविण्यात आली. सुरक्षा दलांनी आपल्याला घेरल्याची बाब लक्षात येताच दहशतवाद्यांनी बचावासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. तसेच गोळीबारही सुरू केला. सुरक्षा जवानांनी या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर देत पहिल्या पाऊण-एक तासातच पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतरही चकमक सुरूच होती. पाच दहशतवादी ठार झाल्याची खात्री होताच जवानांनी त्याच परिसरात शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहिमेवेळी आणखी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आल्यामुळे मृत दहशतवाद्यांची संख्या 6 वर पोहोचली.

गरुड कमांडो शहीद

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत गरुड कमांडो दलातील एक जवान शहीद झाला. तसेच अन्य दोन लष्करी जवान जखमी झाले आहेत. या चकमकीनंतर दहशतवादी लपलेल्या भागातून शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. एके-47, रायफल्स, डिटोनेटर्स, हातबॉम्ब, स्फोटके जप्त करण्यात आल्याची माहिती सुरक्षा सूत्रांकडून देण्यात आली.

बंदोबस्तात वाढ, इंटरनेट सेवा ठप्प

बांदिपोरामध्ये झालेल्या भीषण चकमकीच्या पार्श्वभूमीवर बांदिपोरा भागातील मोबाईल इंटरनेट यंत्रणा बंद करण्यात आली होती. तसेच या भागात सुरक्षा यंत्रणाही कडेकोट करण्यात आली होती. या चकमकीनंतर घातपाती कारवाया वाढण्याचा धोका लक्षात घेऊन सावधगिरीसाठी पावले उचलण्यात आली आहेत.

Related posts: