|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कुपवाडात दोन बोगस खत कारखान्यांवर छापा

कुपवाडात दोन बोगस खत कारखान्यांवर छापा 

कुपवाड / वार्ताहर

 कुपवाड औद्योगिक क्षेत्रासह जिह्यात विनापरवाना व बेकायदा बोगस खतनिर्मिती करणाऱया कारखान्यांचा सुळसुळाट झाल्याने शेतकऱयांवर मोठय़ा नुकसानीचा सामना करण्याची वेळ आली आहे. याबाबच्या तक्रारीची दखल घेत कृषि विभागाच्या राज्य व जिल्हा भरारी पथक तसेच कुपवाड पोलिसांच्या पथकाने शनिवारी कुपवाड एमआयडीसीतील मायक्रो लॅब व भाटीया भूमिपुतर टेडको या दोन बोगस खत कारखान्यावर संयुक्तपणे छापा टाकून दोन्ही कारखान्यातील सुमारे 50 लाखांचा खताचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिसांत गुन्हे दाखल करुन खतांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

याप्रकरणी मायक्रो लॅबचे संचालक साहील अरुण कोठारी (रा.धामणी रोड, सांगली) व भाटीया टेडको प्रा.लि.चे संचालक जसपाल सतपाल भाटीया  (रा.सांगली) यांच्याविरोधात जीवनावश्यक वस्तू कायदा कलमानुसार गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याविरोधात जिल्हा कृषि विभागाचे गुण नियंत्रण अधिकारी डी.एस.शिंगे यांनी फिर्याद दिली आहे. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान, जिह्यातील औद्योगिक परिसरांत अनेकठिकाणी राजरोस बोगस खतनिर्मितीचे उद्योग सुरु आहेत. त्यामुळे राज्याच्या कृषि विभागाकडून छापासत्र मोहीम हाती घेतली आहे. या दोन्ही कारखान्यांची तक्रार कृषि विभागाकडे आली होती. त्यानुसार कारवाई केली असल्याचे कृषि अधिकारी व पोलिसांनी सांगितले. .

पोलीस व कृषि अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपवाड औद्योगिक वसाहतीत सांगलीचे उद्योजक साहिल अरुण कोठारी (रा.धामणी रोड) यांचा मायक्रो लॅब (प्लॉट नंबर जी-1/बी) हा खतनिर्मितीचा कारखाना गेल्या तीन वर्षापासून सुरु आहे. या कारखान्यात विनापरवाना व बेकायदा सेंद्रीय खताची निर्मिती, विक्री व साठवणूक केली जात होती. याबाबतची गोपनिय माहिती कृषि विभागाला मिळाली. त्यानुसार कृषि विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मायक्रो लॅब कारखान्यात छापा टाकला. प्रत्यक्ष पाहणी केली असता कारखान्यात खतनिर्मिती, विक्री व साठवणूक केल्याबाबतचा रितसर परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच अन्य कारखान्यातील खताचा साठा दुसऱया पोत्यात पॅकिंग केल्याचे आढळले. त्यामुळे अधिकाऱयांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईत सिलीकॉन खताच्या 50 किलोच्या 240 पिशव्या, मिश्र खताच्या 160, सेंद्रीय दाणेदार खताच्या 409, निम ऑरगॅनिकच्या 65, सेंद्रीय खताच्या 210 यासह एक ट्रक व आयशर टेम्पो मिळून 20 लाख 84 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारखान्यातील बोगस खतांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत.

दुसऱया कारवाईत उद्योजक जसपाल सतपाल भाटीया (रा.सांगली) यांच्या कुपवाड एमआयडीसीत प्रणव ऍग्रो इंडस्ट्रीजच्या आवारात भाडय़ाने घेतलेल्या एका मोठय़ा गोडावूनमध्ये दोन वर्षापासून सुरु असलेल्या भाटीया टेडको प्रा.लि. या खत कारखान्यावर छापा टाकून कारवाई केली. या कारखान्यात सिलिका वाळूचा वापर करुन सिलीकॉनच्या विविध खतांची निर्मिती व साठवणूक केली जाते. मात्र, या खत उत्पादन, विक्री आणि साठवणुकीला शासनाच्या कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे आढळून आले. याबाबतही तक्रार आल्याने कृषि विभागाने शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत पथकाला कॅल्शिअम, सिलिकॉन, सुपर सिलीकॉन व सेकंडरी खताची 3 हजार 481 पोती (163.17 मेट्रीक टन) असा एकुण 27 लाख 83 हजाराचा खतांचा साठा कारखान्यातुन जप्त करण्यात आला आहे. या कारखान्यातीलही खताचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. या कारवाईत पुणे कृषि विभागाचे उपसंचालक के.बी.डेरे, तंत्र अधिकारी बी.सी.मोरे व किरण जाधव तसेच सांगली कृषी विभागाचे विकास अधिकारी विवेक कुंभार, मोहीत अधिकारी डी.एम.पाटील, गुण नियंत्रण अधिकारी डी.एस.शिंगे यासह कुपवाडचे पो.निरीक्षक अशोक कदम, डी.बी.पथकाचे प्रमुख हवालदार प्रवीण यादव व नितीन मोरे यांचा समावेश होता. याप्रकरणी अधिक तपास पो.निरीक्षक अशोक कदम करीत आहेत.

Related posts: