|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिरशीच्या चक्रीभैरव मंदिरात नरबळी?

शिरशीच्या चक्रीभैरव मंदिरात नरबळी? 

शिराळा तालुक्यातील घटना : मूर्तीच्या समोरच रक्ताच्या थारोळय़ात मृतदेह आढळला : लिंबू-सुया, हळद-पुंकू सापडले : खुनाचा गुन्हा नोंद

प्रतिनिधी/ शिराळा

तालुक्यातील शिरशी, शिवरवाडी व पत शिराळा या तीन गावाच्या हद्दीवरती असणाऱया चक्रभैरव मंदिरात पुरुष जातीचा वय 40 ते 45 वर्ष असणारा मृतदेह आढळून आला आहे. हा नरबळी की खून अशा चर्चा सध्या सुरु आहेत. मृतदेहा शेजारी सापडलेल्या लिंबू, सूया या वस्तू आणि शनिवारचा आमावस्येचा दिवस यावरुन हा नरबळीच असावा अशी जोरदार चर्चा तालुक्यता आहे. मात्र शिराळा पोलिसांच्याकडून खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिरशी, शिवरवाडी व पत शिराळा या तीन गावांच्या हद्दीवरती डोंगरमाथ्यावरती चक्रीभैरवाचे मंदिर आहे. हे मंदिर या तीन गावांच्यापासून किमान तीन किलोमिटर अंतरावरती आहे. डोंगरमाथा हा एक ते दीड किलोमिटरचा आहे. भयाण व उजाड माळरान आजुबाजूला पसरलेले आहे. या मंदिराचे व्यवस्थापन हे चक्रीभैरव  ट्रस्टच्या माध्यमातून चालते. परिसर निर्जन असल्यामुळे दिवसासुध्दा फारसे येथे कोणी फिरकत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी तर इथे भयाण शांतता असल्याचे येथील लोक सांगतात.

सध्या या चक्रीभैरव मंदिराच्या गाभाऱयाचे आणि सभामंडपाचे बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम करण्यासाठी येथे जालना येथील बांधकाम कामगार कार्यरत आहेत. शुक्रवार, 17 रोजी सायकांळी साडेपाच वाजता कामाची सुट्टी करुन येथील बांधकाम कामगार घरी निघून गेले. दुसऱया दिवशी सकाळी हे कामगार सकाळी साडेसातच्या सुमारास पुन्हा कामावरती हजर झाले. बांधकाम सुरु करण्यापूर्वी देवाचे दर्शन घ्यावे म्हणून हे कामगार मंदिराच्या गाभाऱयात आत शिरले. त्या दरम्यान त्यांना चक्रीभैरव देवाच्या मूर्तीच्या समोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह निदर्शनास आला. भयभीत झालेल्या बांधकाम कामगारांनी त्वरित आजुबाजूला असणाऱया लोकांना व मंदिर स्ट्रटीच्या लोकांना या घटनेची माहिती दिली.

त्यानतंर या घटनेची माहिती शिरशी येथील गावकामगार पोलीस पाटील यांच्या कडून शिराळा पोलिसांना देण्यात आली. शिराळा पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधीत प्रकाराची तपासणी केली. त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, मयत झालेली व्यक्ती ही अज्ञात असून त्या व्यक्तीच्या डोक्यावरती आणि डोळ्यावरती दगडाने वार करण्यात आलेले आहेत. हे घाव वर्मी घाव असल्याने व रक्तस्त्राव मोठय़ा प्रमाणात झाल्याने संबंधीत व्यक्तीचा मृत्यू झाला असावा. हा मृतदेह पुरुष जातीचा असून त्याचे वय 40 ते 45 च्या दरम्यानचे आहे. मध्यम बांधा असलेले व अंगात काळे रंगाचा चौकडा शर्ट आणि निळसर रंगाची पँट असा पेहराव मृतदेहाचा आहे. या गुह्यात वापरण्यात आलेले साहित्य हे दगड आणि विटा असे आहे. हा खून केला असावा असा प्राथमिक अंदाज शिराळा पोलिसांच्याकडून वर्तविण्यात आलेला आहे.

परंतु मृतदेह हा मूर्तीच्या समोरच दक्षीण-उत्तर अशा स्थितीत आढळून आला आहे. याशिवाय या मृतदेहाशेजारी सुया खुपसलेले लिंबू, बिब्बे, हळद-पुंकू, नारळ, काहीशा काळ्या आकाराच्या वस्तूही सापडलेल्या असल्याचे नागरिक सांगत आहेत. शुक्रवार आणि शनिवार हे आमावस्येचे दिवस होते. याच रात्री हा अजब प्रकार घडला आहे. त्यामुळे हा खून नसून हा ‘नरबळी’ असल्याचे अंदाज व चर्चा  येथील लोकांच्याकडून व्यक्त केले जात आहेत.

दरम्यानच्या काळात पोलिसांकडून या मृतदेहाची तपासणी करत असताना मृतदेहाच्या खिशामध्ये तासगाव तालुक्यातील पाचवा मैल ते अंकलखोप या गांवापर्यंतची एसटीची तिकीटे सापडली आहेत. परंतु तेथून पुढचा मंदिरापर्यंतचा प्रवास संबंधीत व्यक्तीकडून कसा झाला असावा यासंबंधी काहीच सापडलेले नाही. शिराळा पोलिसांच्या कडून यासंबंधी तपास सुरु असून मयत व्यक्ती एकटीच आली होती कि त्याच्या सोबत काही व्यक्तींचा समावेश असावा याबाबतीतही सखोलपणे तपास सुरु आहे. एकंदरीत तेथील परिसराचा विचार करता रात्रीच्या वेळीच हा प्रकार घडला असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविले जात आहेत.

या घटने दरम्यान पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, शिराळा एपीआय स्वप्निल घोंगडे-पाटील व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळाची व सापडलेल्या वस्तूंची पुरेपूर माहिती घेतली आहे. सापडलेल्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घतलेल्या आहेत. पोलीस अधीक्षक किशोर काळे म्हणाले, संबंधित मयत व्यक्तीच्या मृतदेहाचे फोटो आम्ही इतर पोलीस ठाण्याकडे ओळखीसाठी पाठविलेले आहेत. ज्यांना कुणाला संबंधी माहिती मिळाल्यास त्यांनी शिराळा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे पाटील हे करत आहेत.

Related posts: