जगण्याची नवी उमेद देणारा हॅपी बर्थ डे

येत्या 24 नोव्हेंबरला हॅपी बर्थ डे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रत्येकजण बर्थ डे साजरा करताना दिसतोय. कुणी जगायचं एक वर्ष कमी झालं म्हणून तर कुणी अजून एक वर्ष जगलो म्हणून बर्थ डे साजरा करतो. परंतु, जर का तुम्हाला समजले की पुढच्या वर्षी तुम्ही तुमचा बर्थ डे साजरा करू शकाल की नाही याची गॅरंटी नाही तर तुमची काय रिऍक्शन असेल?
थॅलॅसेमिआ हा रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे जो अनुवांशिकतेने लहान मुलांना होतो. साधारण जन्माच्या तिसऱया महिन्यापासून या रोगाची लक्षणं दिसू लागतात. शरिरातील हिमोग्लोबिन निर्माण करण्याच्या प्रक्रियेत गडबडी निर्माण झाली की रक्तक्षीणता जाणवू लागते. शरिरातील रक्ताच्या कमतरतेमुळे बाहेरून रक्तपुरवठा करावा लागतो. हे शारीरिक, मानसिक आणि सांपत्तिकदृष्टय़ा त्रासदायक असून वाईट गोष्ट म्हणजे या आजारावर अजून तरी इलाज सापडलेला नाही. अशाच असाध्य रोगाने पीडित असलेल्या एका तरुण मुलाची गोष्ट सांगणार आहे एक चित्रपट ज्याचं नाव आहे हॅपी बर्थ डे…
या चित्रपटाची कथा आहे एका टिनेजरची. मध्यमवर्गीय कुटुंबातील एका जय नावाच्या मुलाची. जो थॅलॅसेमिआ या कधीही बरा न होणाऱया रोगाने आजारी आहे. पण, त्याला याची कल्पना नाही. आईवडील बहीण आणि तो अशा चौकोनी कुटुंबात राहणारा जय लहानपणापासूनच अत्यंत खोडकर तरीही सर्वांचा लाडका. थॅलॅसेमिआने आजारी असल्यामुळे जगण्यासाठी दर पंधरवडय़ाला त्याला रक्त द्यावं लागत असतं तरीही त्याचं पुढचं आयुष्य किती हे डॉक्टर्ससुद्धा ठामपणे सांगू शकत नसतात. त्यालाही आश्चर्य वाटत राहायचं आणि प्रश्नही पडायचा की घरचे त्याला मैदानी खेळ खेळायला का पाठवत नाहीत किंवा पावसात मनसोक्त भिजायला का देत नाहीत? त्याच्या सोळाव्या वाढदिवशी त्याला अचानकपणे त्याच्या आजाराबद्दल कळते आणि हे ही समजते की तो सतराव्या वाढदिवसाला या जगात असेल की नाही याची शाश्वती नाही. या सर्वांच्या अनुषंगाने पुढे काय काय घडते ते हॅपी बर्थ डे चित्रपटातून मांडण्यात आले आहे.
मुकुलिना चित्र आणि रेड स्मिथ प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे दिलीप कोलते यांनी आणि सहनिर्माती आहे सायरा सय्यद. थॅलॅसेमिआ आजाराने ग्रस्त एका मुलाची ही कथा असून याचं दिग्दर्शन केलंय नारायण गोंडाळ यांनी. चित्रपटात रिंगणफेम शशांक शेंडे व ‘श्वास’ फेम अरुण नलावडे महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. निमेश किजबिले, अमरदीप ठोंबरे, सेजल घरत, शुभम नारिंगीकर, ओजस ठोंबरे, आर्या केळशीकर, गौरांगी शेवडे, अमित पाटील, मनाली ठोंबरे आणि मयुरी फडतरे यांच्यादेखील या चित्रपटात भूमिका आहेत.
या चित्रपटाचे संगीत विक्रांत वार्डे यांनी केलं असून गीतकार मनीष अन्सुरकर आणि विक्रांत वार्डे यांच्या शब्दरचनांना रोहित राऊत आणि आनंदी जोशी (तू येताना सामोरी) आणि जावेद अली (दान आभाळाचे) यांनी स्वरसाज चढवला आहे. हॅपी बर्थ डे चित्रपटाला अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट प्रथम निर्मिती, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता, सर्वोत्कृष्ट संगीतकार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आणि सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक अशी सात नामांकने आहेत.