|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राहुल होणार काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान

राहुल होणार काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान 

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात बिनविरोध निवडीची शक्यता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा केव्हा येणार, या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेत प्रश्नाचे उत्तर डिसेंबरच्या पहिल्या आठडय़ात मिळणार आहे. पक्षातंर्गत निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित करण्यासघ्ठी सोमवारी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. यामध्ये अध्यक्षपदासह अन्य पदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल, असे रविवारी सूत्रांनी स्पष्ट केले. 

 काँग्रेसचे नेते मुलापल्ली रामचंद्रन यांच्याकडे पक्षातंर्गत निवडणुकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  पक्षाच्या घटनेनुसार निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकावर काँग्रेस कार्यकारिणी अंतिम निर्णय घेणार आहे. नियोजनानुसार 24 नोव्हेंबरपर्यंत अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करावयाचे आहेत. अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आल्यास त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यांच्याविरोधात कोणी अर्ज दाखल केल्यास 8 डिसेंबर रोजी मतदान होईल. 11 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे; परंतु राहुल गांधी हे बिनविरोध अध्यक्षपदी नियुक्त होतील, असे काँग्रेसच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात काँग्रेसचे युवराज अध्यक्षपदाची धुरा अधिकृतपणे स्वीकारतील, अशी चर्चा पक्षात आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 9 डिसेंबरला होणार आहे. गुजरातमध्ये ‘मोदी विरूद्ध राहुल’ असा सामना रंगला आहे. त्यामुळे येथील मतदानापूर्वी राहुल यांनी पक्षाची धुरा सांभाळल्यास पक्षाला निश्चित याचा फायदा होईल. तसेच 2019मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणूनही त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल, असे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.

2013मध्ये राहुल गांधी यांच्याकडे उपाध्यक्षपद देण्यात आले होते. गेली 19 वर्ष सोनिया गांधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. आता राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपद आल्यास सोनिया गांधी यांची भूमिका ही मार्गदर्शकाची राहील, असे मानले जात आहे.

Related posts: