|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर

‘पद्मावती’चे प्रदर्शन लांबणीवर 

वादाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांचा निर्णय : 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता चित्रपट, प्रदर्शनाची पुढील तारीख अनिश्चित

प्रतिनिधी / मुंबई

प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱयात सापडलेल्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावती’ हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार नाही. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे. चित्रपटातील राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पद्मावती चित्रपटाला राजपूत संघटनांनी विरोध केला आहे. करणी सेनेने अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळी यांना उघडपणे धमकीही दिली. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही तांत्रिक बदलांची कारणे देत चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट प्रदर्शित करण्याची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते व्हायकॉम-18 मोशन्स पिक्चर्सने दिली आहे.

पद्मावतीची घोषणा झाल्यापासून विविध कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटाच्या कथानकावर करणी सेनेचा आक्षेप आहे. राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावर प्रेमप्रसंग चित्रीत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पण भन्साळी यांनी असे कोणतेही दृष्य चित्रीत न केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. जयपूर येथे या चित्रपटाच्या सेटवर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरणादरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते. ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शनानंतर हा विरोध तीव्र झाला.

सेन्सॉरकडूनच चित्रपट प्रमाणित करण्यात दिरंगाई

चित्रपट प्रमाणित करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी स्पष्ट केले. कागदपत्रांमध्ये तो काल्पनिक चित्रपट आहे की ऐतिहासिक हे स्पष्ट केलेले नाही. हे जाणून घेण्यासाठी सेन्सॉरने भन्साळींकडे विचारणा केली आहे. पण, उलटपक्षी सेन्सॉरवरच चित्रपट प्रमाणित करण्यात दिरंगाई केली जात असल्याचे आरोप लावले जात आहेत, असेही ते म्हणाले. ऐतिहासिक कथानकावर आधारित या चित्रपटात दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.

आज महामोर्चा

‘पद्मावती’ चित्रपटाविरोधात सोमवारी मुंबईतील आझाद मैदान येथे महामोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाचे मुख्य आयोजक भाजप आमदार राज पुरोहित असून यामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होणार आहेत. तसेच या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी करणी सेनाप्रमुख सुखदेवसिंह गोगामेडी, राजस्थानहून करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कल्वी येणार असल्याचे राज पुरोहित यांनी सांगितले. तसेच राज्याचे मंत्री जयकुमार रावल, आमदार राम कदम, भाजप नेते आरयू सिंह हेही सहभागी होणार आहेत.

Related posts: