|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » आठशे ग्रॅमच्या छकुलीला वाचवण्यासाठी 40 दिवस प्रयत्नांची पराकाष्टा!

आठशे ग्रॅमच्या छकुलीला वाचवण्यासाठी 40 दिवस प्रयत्नांची पराकाष्टा! 

जान्हवी पाटील/ रत्नागिरी

यापूर्वी अगदी 1500 ग्रॅम वजनाच्या नवजात शिशुंना वाचवण्यात रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयाला यश आले आहे. यापेक्षा कमी वजनाच्या शिशुला वाचवणे म्हणजे पुनर्जन्म मिळाल्यासारखे आहे. मात्र जिल्हा शासकीय रूग्णालयाने अवघ्या 800 ग्रॅमच्या छकुलीला वाचवण्यासाठी 40 दिवस अहोरात्र मेहनत घेतली. या छकुलीला पुनर्जन्म मिळेल की नाही, याची साशंकता खासगी हॉस्पीटला होती, मात्र जिल्हा रूग्णालयाच्या नवजात शिशु विभागाने या छकुलीचे वजन सुधारावे, यासाठी कर्तव्यापलिकडे जावून प्रयत्न केले आणि आश्चर्य म्हणजे 40 दिवसात या छकुलीचे वजन 800 वरून 1800 ग्रॅम झाले. त्यामुळे तिला शनिवारी शिशु विभागातून डिस्चार्ज देण्यात आला असून या बाळाच्या कुटुंबियांनी हात जोडून परिचारिकांचे आभार मानले.

सायमा जावेद सनदी (गोळप मोहल्ला, रत्नागिरी) हिची प्रसुती एका खासगी हॉस्पीटलमध्ये 10 ऑक्टोबर 2017 रोजी झाली. जन्मत:च संबंधित शिशुचे वजन जेमतेम 1 किलो इतके होते. इतकी वाईट परिस्थिती होती. त्यामुळे त्या हॉस्पीटलने सिव्हीलला हलविण्याचा सल्ला दिला. त्याच रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी तिला जिल्हा शासकीय रूग्णालयातील नवजात शिशु विभागात दाखल करण्यात आले. शिशुला पाहताच विभागातील परिचारिकांनी त्वरित उपचार सुरू केले. मध्यरात्री बालरोग तज्ञ डॉ. विजय सूर्यगंध आणि डॉ. शिवाजी घुमरे यांनी बाळाची तपासणी करून प्रत्यक्षात औषधोपचार सुरू केले आणि शिशुला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. त्यावेळी जेमतेम 800 ग्रॅम वजन झाले होते. वजन वाढण्याऐवजी कमी झाल्याने सगळा स्टाफ चिंतेत होता, मात्र वैद्यकीय अधिकाऱयांच्या यशस्वी उपचारानंतर या शिशुच्या तब्येतीत 2 आठवडय़ानंतर थोडी सुधारणा झाली. त्यानंतर तब्बल 40 दिवसानंतर या छकुलीने हालचाल सुरू केली. आता तिचे वजन 1800 गॅम इतके आहे. हे उपचार सुरू असताना तिची संबंधित शिशुची आई सायमा आणि आजी दिवस-रात्र जागून काढत होत्या. काहीही करून आपली छकुली सुधारली पाहिजे, याच विश्वासावर त्यांनी येथे 40 दिवस काढले. उपचाराला तितकाच चांगला प्रतिसाद नातेवाईकांनीही दिला.

अशा प्रकारची या विभागाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती आणि ती परिचारिका व बालरोग तज्ञांनी यशस्वी करून दाखवली. यासाठी डॉ. विजय सूर्यगंध, डॉ.शिवाजी घुमरे यांच्यासह बालरोग तज्ञ परिचारिका उषा कोल्हे, सुभदा मांजरेकर, नम्रता नाखरेकर, गायत्री गोराटे, दिपाली आग्रे, सुप्रिया, नेहा सातपुते, जान्हवी कांबळे, कल्याणी पवार, सुरेखा कोकरे, पौर्णिमा खैर, भारती परब, शैलेंद्र कांबळे, आकांक्षा ओरपे, आकांक्षा जोशी, माधुरी गोताड, निकिता वाघमारे, निकिता नागरगोजे, मानसी मोरे, दिलीप सावंत आदी दोन्ही शिफ्टमधील स्टाफने अहोरात्र मेहनत घेतली.

 ‘कांगारू मदर केअर सेंटर’मुळे बाळामध्ये सकारात्मक बदल

या शिशुच्या उपचारासाठी आणखीन महत्वाची गोष्ट ठरली ती, ‘कांगारू मदर केअर सेंटर’. या उपचार पध्दतीमुळे बाळामध्ये सकारात्मक बदल घडून आला. यासाठी नवजात शिशु विभागातील परिचारिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या परिचारिका मातेला बाळाला ऊब कशी द्यायची, ज्या पध्दतीने कांगारूचे पिल्लू त्याच्या खुशीत असते. त्या पध्दतीने बाळाला जवळ घ्यायचे. या उपचारामुळे बाळामध्ये खूप चांगली सुधारणा झाल्याचीही माहिती बालरोग परिचारिका तज्ञ उषा कोल्हे यांनी दिली.