|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पालकमंत्र्यांच्या बैठकीतही उसदरावर तोडगा नाही

पालकमंत्र्यांच्या बैठकीतही उसदरावर तोडगा नाही 

साखर कारखानदार एफआरपी अधिक 200 रूपयावर ठाम : शेतकरी संघटनेमध्ये फूट

प्रतिनिधी/ सोलापूर

ऊसदराच्या प्रश्नावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या बैठकीतही शेतकरी संघटना आणि कारखानदार आपापल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, शेतकरी संघटनामध्ये उसदरावरून फुट पडली असल्याची बाब समोर आली आहे.

  जिल्हय़ात ऊसदराचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यानी आंदोलने सुरू केली आहेत. दराचा हा प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी जिल्हय़ातील सर्वच शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱयांची बैठक आयोजित केली होती. त्यापूर्वी त्यांनी जिल्हय़ातील कारखान्यांच्या पदाधिकाऱयांशीही चर्चा केली होती.

या बैठकीला ग्रामीण पोलिस अधिक्षक वीरेश प्रभू, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, माजी आमदार दिलीप माने, मनसे नेते दिलीप धोत्रे, जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैय्या देशमुख, दिपक भोसले, बळीराज संघटनेचे घाटणेकर, महमुद पटेल, विश्रांती भुरूसकर यांच्यासह स्वाभीमानी शेतकरी संघटना, बळीराजा, रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

 ऊसाचा भाव निश्चित करण्यासाठी दुपारी साखर कारखानदारांची चर्चा केली. कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगरप्रमाणेच सोलापुरातही हाच पॅटर्न एफआरपी अधिक 200 रूपये देवू असे साखर कारखानदारांचे म्हणणे आहे. तर शेतकरी संघटना 2700 रूपयावर ठाम आहेत. या बैठकीतही संघटनांच्या पदाधिकारी याच दरावर ठाम राहीले. जनहित शेतकरी संघटनेचे भैय्या देशमुख म्हणाले की, कुणाला ही कल्पना न देता पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. शेतकरी संघटना आजही 2700 रूपयावर ठाम आहे. त्यामुळे दोन मंत्री सोलापुरात असूनही तोडगा निघत ही दुर्देवी बाब असून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत तातडीने हा प्रश्न मिटवावा.

  रयत क्रांती, मनसे आणि स्वाभिमानी संघटना एकत्रित येवून साखर कारखानदाराशी चर्चा केली. एफआरपी अधिक 400 रूपयांची मागणी केली असल्याचे रयत क्रांती संघटनाचे दिपक भोसले यांनी सांगितले. त्यामुळे शेतकरी संघटनांची गेल्या चार दिवसातील भूमिका आणि आज काही संघटनांनी वेगळी चूल मांडत घेतलेली भूमिका पहाता एकत्रित आलेल्या संघटनांमध्ये फूट पडली असल्याची बाब समोर आली आहे.                 

आज निर्णय होण्याची शक्यता

ऊसाचा दर निश्चित करण्यासाठी आज सोमवारी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची बैठक बोलवली होती. झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी साखर कारखानदार व शेतकरी संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले असून मंगळवारी ऊस दराचा तोडगा निघण्याची शक्यता आहे