|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कॉलेज युवकाचा अपहरणाचा प्रयत्न

कॉलेज युवकाचा अपहरणाचा प्रयत्न 

संगमेश्वरात गाडीत बसवून भोस्ते घाटात सोडले

यंदा तू क्रिकेट खेळू नकोसची दिली धमकी

संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वार्ताहर / संगमेश्वर

तालुक्यातील परचुरी येथील कॉलेजला गेलेल्या युवकाला चौघा अज्ञात युवकांनी संगमेश्वर येथे गाडीमध्ये भरुन अपहरण केले. मात्र हा युवक खेड येथील भोस्ते घाटात रात्री सुखरुप सापडल्याने साऱयांचा जीव भांडय़ात पडला. ही सिनेस्टाईल घटना सोमवारी घडली. या बाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजदत्त दीपक गुरव असे या कॉलेज युवकाचे नाव असून तो कोळंबे येथील एस.के.पी.एम. ज्युनिअरचा विद्यार्थी आहे. या बाबत त्याचे वडील दीपक बाबी गुरव यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली. दीपक गुरव यांचा मुलगा राजदत्त गुरव हा एस.के.पी.एम. ज्युनिअर कॉलेजचा बारावी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. सध्या कॉलेजमध्ये हिवाळी स्पर्धा सुरु आहेत. त्यामुळे सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान राजदत्त हा नेहमी घरातून बाहेर पडत असे व सायंकाळी 3 वा.च्या दरम्यान घरी परत येत असे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडला तो परत आला नाही. वडील दीपक गुरव हे कामानिमित्त संगमेश्वर येथे गेले होते ते परतले असता त्यांना राजदत्त हा घरी आला नसल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी त्याच्या मोबाईलवर कॉल लावला असता मोबाईलची रिंग वाजली, मात्र कॉल उचलला गेला नाही. त्यांनी परत मोबाईलला रिंग केली असता राजदत्तने फोन उचलला व आपण भोस्ते घाट-खेड येथे असल्याचे सांगितले.

त्यावेळी वडिलांनी राजदत्तला विचारले असता त्याने आपण दुपारी 3.15 वा. संगमेश्वर येथे शर्ट घेण्यासाठी आलो असता संगमेश्वर बाजारपेठेत एका अनोळखी इसमाने तुझा भाऊ राज याचा अपघात झाला असून तू चल, असे सांगितले व लाल रंगाच्या स्वीफ्ट कारमध्ये भरले. यावेळी गाडीतील इतर माणसांच्या तोंडाला काळे स्कार्प बांधले होते. गाडीमध्ये बसलेल्या माणसांनी राजच्या तोंडाला रुमाल लावल्याने राज बेशुध्द पडला. ज्यावेळी त्याला शुध्द आली तेव्हा तो खेड येथे भोस्ते घाटात असल्याचे समजले. शुध्दीमध्ये असताना तू यावर्षी क्रिकेट खेळू नकोस, असे सांगितले. तसेच तेथे आलेल्या स्कॉर्पिओतील माणसांनी स्वीफ्ट कारचा पाठलाग केल्याने ते राजदत्तला तेथेच सोडून गेल्याचे फिर्यादित म्हटले आहे. स्वीफ्ट कारमधून पळवून नेणाऱया अनोळखी इसमाविरुध्द संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.

Related posts: