|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राजापुरात दोन बिबटे विहिरीत

राजापुरात दोन बिबटे विहिरीत 

दसूर व परूळे गावातील घटना

दोघांनाही बाहेर काढण्यात यश

वार्ताहर /राजापूर

तालुक्यातील जांभवली येथे बिबटय़ाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानाच दसूर व परूळेमध्ये भक्ष्याच्या पाठलागात विहिरीत पडलेले दोन बिबटे सापडले आहेत. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर आल्या वनविभागाने पिजऱयाच्या साहाय्याने दोन्ही बिबटय़ांना विहीरीतून सुखरूप बाहेर काढले. बिबटय़ांच्या वाढत्या संचाराच्या पार्श्वभुमीवर राजापुरकर भीतीच्या छायेखाली आहेत.

दसूर गावातील कमलाकर अर्जुन सुर्वे यांच्या घरालगतच्या परसबागेत असलेल्या विहीरीत सोमवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान एक बिबटय़ा पडला. भक्ष्याचा पाठलाग करताना बिबटय़ाने मारलेली उडी चुकली आणि बिबटय़ा थेट विहीरीत पडला. रात्री पाण्यात काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाल्याने सुर्वे यांनी विहीरीत जाऊन पाहिले असता पाण्यात बिबटय़ा पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थ राकेश सुर्वे यांनी तात्काळ याबाबत वनपरिक्षेत्रपाल बी. आर. पाटील यांना माहिती देताच पाटील यांच्यासह राजापुरच्या वनपाल राजश्री कीर, एस. एम. रणधीर, व्ही. एम. कुंभार, पी. एम. डोईफोडे, एम. एस. गवाणकर, आदींनी दसूर गावी धाव घेतली.

त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने वनविभागाच्या कर्मचाऱयांनी पिंजरा विहीरीत सोडला व आत पडलेल्या बिबटय़ाला पिंजऱयात जेरबंद करून सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून बिबटय़ाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान विहीरीत पडलेला बिबटय़ा नर जातीचा असून सुमारे चार ते पाच वर्षाचा आहे. त्याची लांबी 205 मीटर असून 70 मीटर उंची असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली.

दसूरमधील बिबटय़ाला सुखरूप बाहेर काढल्यावर त्याला नैसर्गिक आदीवासात सोडून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी परतत असतानाच परूळे गावात बिबटय़ा विहीरीत पडल्याची खबर मिळली. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने आपला मोर्चा परूळेकडे वळविला. परूळे खापणेवाडीतील एका विहिरीत सोमवारी रात्रीच्याच वेळी बिबटय़ा पडला होता. वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत बिबटय़ाला पिंजऱयाद्वारे सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर या बिबटय़ालाही नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

रविवारी सायंकाळी जांभवली गावातील एक साठ वर्षीय महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या महिलेचा मृत्यु बिबटय़ाच्या हल्ल्यात झाल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच मंगळवारी विहीरीत पडलेल्या दोन बिबटय़ांना पिंजऱयात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मानवी वस्तीत बिबटय़ांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.

Related posts: