|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महाविद्यालय परिसरातील ‘भाई’ पोलिसांच्या रडारवर

महाविद्यालय परिसरातील ‘भाई’ पोलिसांच्या रडारवर 

प्रतिनिधी/ कराड

जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी जिल्हय़ातील गुन्हेगारी टोळय़ांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मोहीम सुरू केल्याने गुन्हेगारी क्षेत्राला चांगलाच हादरा बसला आहे. प्रथमेश संकपाळ याचे खून प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. कॉलेज परिसरासह शहरात गुंडगिरी करणाऱया टोळय़ांची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱया प्रथमेश संकपाळ याचा खून झाल्यानंतर महाविद्यालय परिसरातील गुन्हेगारी टोळय़ांसह फाळकुटदादांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी या माहितीच्या आधारे गुन्हेगारी रेकॉर्ड तयार करण्याची कार्यवाही सुरू केली असून शहरातही काही टोळय़ा अद्याप कार्यरत आहेत. खून, खंडणी, मारामारी, सशस्त्र हल्ल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असणारे काही जण जामिनावर बाहेर असून ते पुन्हा टोळय़ा तयार करू लागल्याची माहिती पोलिसांपर्यंत आली आहे. जिल्हय़ातील गुन्हेगारी टोळय़ा संपुष्टात आणण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अनेक टोळय़ांना मोक्का लावला आहे. या पार्श्वभूमीवर कराड परिसरातील टोळय़ांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत. यातच प्रथमेश संकपाळ या युवकाचा खून झाल्याने पोलिसांच्या हालचालींना वेग आला आहे.

याबाबत पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रथमेश संकपाळच्या खून प्रकरणानंतर कराडच्या गुन्हेगारी वर्तुळातील हालचालींवर पोलिसांची बारीक नजर आहे. विशेषतः महाविद्यालय परिसरात दहशत माजवत टोळय़ा तयार करणाऱयांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींविषयी नागरिकांनी पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.