|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राज्यात संपूर्ण दारूबंदी करा

राज्यात संपूर्ण दारूबंदी करा 

प्रतिनिधी/ बेळगाव

राज्यात मद्य आणि अंमली पदार्थांवर निर्बंध लादून कर्नाटक राज्य व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना लोकप्रतिनिधी हे विसरून राज्यात आणखी मद्याची दुकाने सुरू करावीत, या मागणीसाठी विधानसभेत चर्चा करीत आहेत. हे लज्जास्पद असून राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजना आणि अखिल कर्नाटक जनजागृती वेदीके धर्मस्थळ यांच्यावतीने करण्यात आली आहे. मंगळवारी या मागणीसाठी हलगा येथील सुवर्णसौधच्या उद्यानात संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.

राज्याचे अबकारी मंत्री तिम्मापूर यांनी ‘मागणी असलेल्या ठिकाणी एमएसआयएल’ची दुकाने सुरू करण्यास परवानगी देणार असल्याचे सांगितले आहे. ग्रामीण भागात गावठी तसेच चोरटी दारूच्या उद्योगाने जोर धरलेला आहे तर बऱयाच ठिकाणी किराणा दुकानातूनही बेकायदेशीररित्या दारूची विक्री सुरू आहे. यावर आळा घालण्यासाठी आणि उत्तम प्रकारचे मद्य पुरवठा करण्याचे सांगत अबकारी मंत्र्यांनी एमएसआयएलची मागणी असल्यास ही दुकाने सुरू करण्याची परवानगी देणार असल्याचे सांगितले आहे. यावरून या सरकारचा संपूर्ण राज्य दारूमय बनविण्याचा उद्देश स्पष्ट असल्याचे दिसून येते, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

राज्यातील 30 जिह्यातील 206 तालुक्यांमध्ये 29 हजार 406 खेडी आहेत. सरासरी जिह्यास 335 याप्रमाणे तालुक्यात 48 याप्रमाणे दारू दुकाने आहेत. तर राज्यातील 6.75 कोटी लोकसंख्येत 1.75 कोटी लोक दररोज मद्यपान करतात, असा अहवाल सर्वेक्षणातून आला आहे. यामुळे राज्यातील बहुसंख्य जनता व्यसनाधीन होत आहे. यासाठी संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनस्थळी राज्याचे अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी भेट दिली असता आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यासमोर राज्यात संपूर्ण दारूबंदीची मागणी केली. यावर थातूरमातूर उत्तरे देवून मंत्र्यांनी काढता पाय घेतला.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते जगदीश शेट्टर यांनी राज्यातील संपूर्ण दारूबंदीबाबत आपण विधानसभेच्या सभागृहात हा विषय मांडणार असल्याचे यावेळी सांगितले. तसेच राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेणार असल्याचे आश्वासनही यावेळी दिले..

Related posts: