|Tuesday, June 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » …म्हणे बेळगावात मराठी भाषिक उपरेच

…म्हणे बेळगावात मराठी भाषिक उपरेच 

आमदार सी. एम. इब्राहिम बरळले

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगावातील मराठी भाषिक हे स्थानिक रहिवासी नव्हेत, ते तर बेळगावात उपरे आहेत, फक्त कामकाजाच्या निमित्त बेळगावात येऊन ते येथील रहिवासी बनले आणि कर्नाटकावर आपला हक्क सांगत आहेत, अशी मुक्ताफळे विधानपरिषद सदस्य सी. एम. इब्राहिम यांनी उधळली. सीमाबांधवांच्या जखमेवर मीठ चोळणारे त्यांचे वक्तव्य निषेधार्ह ठरले असून त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

बेळगावची सर्व जमीन केवळ लिंगायत आणि मुस्लिम बांधवांची होती. या ठिकाणी महाराष्ट्रातून मराठी भाषिक कामानिमित्त आले व त्यांनी येथील जमीन खरेदी केली, असा हस्यास्पद जावई शोध विधानपरिषद सदस्य सी. एम. इब्राहिम यांनी लावला असून त्यांनी याबाबत विधानपरिषदेत ही माहिती दिली. बेळगाव कधीच महाराष्ट्रात जाणार नाही, अशी फुशारकीही त्यांनी यावेळी मारली.

नेहमी गॉगल घालून वावरणाऱया सी. एम. इब्राहिम यांना त्या गॉगलमधून नेमके काय दिसते हेच आता समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगावात मराठी भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. सर्वात जास्त मराठी भाषिक त्यानंतर इतर समाजाचे लोक राहत असतात. यामध्ये अनुसुचित जाती, जमातीचे, मुस्लीम बांधव, धनगर, लिंगायत, जैन याचबरोबर इतर अनेक समाज या ठिकाणी वास्तव्यास आहेत. हे सर्व समाज पूर्वी मराठी भाषेतच आपले व्यवहार करत होते, याची माहिती सी. एम. इब्राहिमना माहित नसल्याचे दिसून आले.

एवढेच काय, पूर्वीचे सात-बारा उतारे, डायऱया सर्वच कागदपत्रे मराठीत होते. याची थोडीशीही कल्पना सी. एम. इब्राहिम यांना नसल्याचे दिसून आले. एकूणच डोळय़ावर गॉगल घालून जणू मी त्या गॉगलमधून वेगळेच पाहत आहे, हे दाखवून दिले. केवळ भाषणबाजी करुन त्यांनी मराठी भाषिकांच्या विरोधात गरळ ओकली. त्यांनी जर बेळगावमधील थोडासा अभ्यास केला असता तर त्यांना बेळगाव महाराष्ट्राचे आहे की कर्नाटकाचे आहे? याची जाणिव झाली असती. पण केवळ विषय आला म्हणून काही तरी बोलायचे आणि स्वतः हिरो व्हायचा प्रयत्न ते नेहमीच करत असतात, असेही यावेळी दिसून आले.

Related posts: