|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा क्रांती मोर्चाची सुवर्णसौधला धडक

मराठा क्रांती मोर्चाची सुवर्णसौधला धडक 

प्रतिनिधी/ बेळगाव

राज्यात क्षत्रीय मराठा समाज बांधवांची लोकसंख्या 28 ते 30 लाख असून राज्याच्या विकासात या समाजाचे योगदान मोठे आहे. मात्र, हा समाज आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेला आहे. सध्या मराठा जातीचा समावेश ‘3 बी’ मध्ये असून या समाजाचा ‘2 ए’ प्रवर्गात समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी आणि आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मंगळवारी सुवर्ण विधानसौध समोरील कोंडसकोप येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. कोंडसकोप येथील माळरानावर भर उन्हातच मराठा समाजातील हजारो बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी याठिकाणी आंदोलन छेडले होते.

दावणगेरी जिल्हय़ातील होदिगेरी येथील शहाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी अनुदान मंजूर करावे, तसेच या स्थळाचा ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात यावा, या मागणीसह कर्नाटक विद्यापीठात छ. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या अध्ययनपीठाची स्थापना करण्यात यावी, अशी प्रमुख मागणीही यावेळी करण्यात आली.

मराठा समाजाचे योगदान मोठे

आंदोलनकर्त्यांची भेट घेवून बोलताना राज्याचे अवजड उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी मराठा समाजास ‘2 ए’ प्रवर्गात समावेश करण्याबाबत तसेच आरक्षणाबाबत राज्य सरकारने नेमणूक केलेल्या आयोगाचे काम सुरू असल्याचे सांगितले. मराठा  समाजाचे राज्य व राष्ट्राच्या विकासात तसेच स्वातंत्र्य लढय़ातही मोठे योगदान आहे तर बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीचे कार्यही मोलाचे असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठात छ. शिवाजी आणि शाहू महाराज अध्ययनपीठ स्थापन करण्यासाठी राज्यसरकारने 2 कोटी मंजूर केले असल्याचेही सांगितले.

आयोगाचा अहवाल आल्यानंतर आरक्षण मंजूर

आमच्याकडून आरक्षणाबरोबरच मराठा समाजाच्या अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. मात्र, याचवेळी आंदोलनकर्त्यां एका कार्यकर्त्याने केवळ प्रयत्न करत बसू नका, तर आरक्षण मंजूर करा अशी मागणी केली. यावर देशपांडे यांनी आयोगाचा अहवाल आल्यानंतर आरक्षण मंजूर होणार असल्याचे सांगितले. मात्र, या उत्तराने समाधान न झालेल्या या कार्यकर्त्याने तुम्ही जोराने मागणी लावून धरल्यास आरक्षण मंजूर होईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांवर दबाव आणणार

कामगारमंत्री संतोष लाड यांनीही मराठा समाजास आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर दबाव आणणार असल्याचे सांगितले. मला मराठा असल्याचा अभिमान असून छत्रपतींचे वंशज असणाऱया आमच्या रक्तातच संघर्ष व लढा  देण्याचे गुण आहेत. यामुळे आरक्षणासाठी मी मंत्री नव्हे तर एक समाजबांधव म्हणूनच या लढय़ात तुमच्यासोबत सहभागी होणार असल्याचे लाड यांनी सांगितले.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते जगदीश शेट्टर यांनीही याठिकाणी येऊन आंदोलनकर्त्यांसमोर बोलताना आपल्या पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास राज्यात मराठा समाजास आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. तर आमदार श्रीनिवास माने यांनी राज्यातील 13 जिल्हय़ांपैकी 6 जिल्हय़ात मराठा समुदाय निर्माणासाठी प्रत्येकी 50 लाखाचे अनुदान मंजूर केल्याचे सांगितले. यावेळी भूगर्भ खात्याचे मंत्री विनय कुलकर्णी, अबकारी खात्याचे मंत्री आर. बी. तिम्मापूर, समाजकल्याण मंत्री एच. अंजनेय, आमदार घोटणेकर, कोनरेड्डी, लक्ष्मीनारायण आदींनीही भेट देवून मराठा समाजास आरक्षणाबरोबरच अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.

कोंडसकोप येथील या माळरानावर भर उन्हातच मराठा समाज बांधवांना आंदोलनासाठी जागा देण्यात आली होती. यामुळे उन्हाच्या तीव्र झळा सोसतच समाजबांधवांनी आपल्या न्यायहक्कासाठी दिवसभर त्याठिकाणी ठाण मांडले. उन्हाची तमा न बाळगता असंख्य संख्येने जमलेल्या मराठा समाज बांधवांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘एक मराठा लाख मराठा’ आणि ‘छ. शिवाजी महाराज की जय’ अशा भाषणांनी हा परिसर दणाणून सोडला.

Related posts: