|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुण्यातील 5 हजार दुचाकींना सीएनजी कीट बसविणार

पुण्यातील 5 हजार दुचाकींना सीएनजी कीट बसविणार 

 पुणे / प्रतिनिधी :

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुण्यातील 5 हजार दुचाकींना सीएनजी कीट बसविण्याचा उपक्रम हाती घेतल्याची माहिती संस्थेचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबतची माहिती देताना सोनटक्के म्हणाले, येत्या 24 नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे दुपारी 3.30 वाजता केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होईल. या सीएनजी दुचाकी अनावरण सोहळ्यासाठी पालकमंत्री गिरीष बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गेल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी. सी. त्रिपाठी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डी. राजकुमार, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या अध्यक्षा वंदना चानना उपस्थित राहणार आहेत.

संचालक राजेश पांडे म्हणाले, दुचाकींना बसविण्यात येणाऱया सीएनजी कीटची किंमत 15 हजार 500 रुपये आहे. यामधील बँक ऑफ महाराष्ट्र 12 हजार रुपये वित्तपुरवठा करणार आहे. कर्ज घेऊन हे कीट बसविणाऱया पहिल्या 5 हजार नागरिकांचे व्याज एमएनजीएल भरणार आहे. पुण्यामध्ये वाढणारी दुचाकींची संख्या आणि त्यासोबतच वाढणारे प्रदूषण या सर्वाला सीएनजी हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी आपल्या दुचाकींना सीएनजी कीट बसवावे. तसेच पन्नासपेक्षा अधिक घरे असणाऱया सोसायटीत मोफत पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) जोडणी करण्यात येणार आहे. सोसायटीतील 90 टक्के ग्राहकांनी 500 रुपये भरून नोंदणी केल्यास 2 टप्प्यात ते पैसे परत दिले जातील. यामध्ये नोंदणी केल्यानंतर 20 टक्के रक्कम आणि जोडणी पूर्ण झाल्यानंतर 80 टक्के रक्कम अशा स्वरुपात परतावा दिला जाणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले.

या वेळी ऑपरेशन आणि देखभाल विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक मिलींद नरहर शेट्टीवार, विपणन महाव्यवस्थापक मिलिंद ढकोले, मयुरेश गानू, माणिक कदम उपस्थित होते.

Related posts: