|Sunday, July 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » यमुनाजळ वाढू लागले

यमुनाजळ वाढू लागले 

भगवंत वसुदेवाच्या मस्तकी टोपलीत विराजमान होऊन कारागृहातून बाहेर पडले आहेत, हे जाणताच बलराम दादा धावतच आले. आभाळातून कोसळणाऱया पावसाच्या जलधारांपासून बालक रुपातील भगवंताचे रक्षण व्हावे म्हणून त्यांनी आपल्या मूळ शेषनागाच्या रुपाने त्या बालकावर छत्र धारण केले. वाटेत काळी यमुना आडवी आली. यमुनेच्या पाण्याला मोठे उधाण आले होते. ही यमुना पार केल्याशिवाय गोकुळात पोहोचता येणार नव्हते. वरून पाऊस कोसळतच होता. पण वेळ झपाटय़ाने सरत होता. बाळाला गोकुळात सुखरूपपणे नंदाच्या घरी पोहोचवून रात्र सरायच्या आंत मायेला घेऊन पुन्हा कंसाच्या कारागृहात वसुदेवाला पोहोचायचे होते. वसुदेवाने मनाचा निर्धार केला आणि भगवंताचे मनोमन स्मरण करून उफाळत्या यमुनेच्या पात्रात प्रवेश केला.

यमुना ही कालींदी रूपातील कृष्णसखी आहे. पुढे तिचा श्रीकृष्णाशी विवाहही झाला. यमुनेला अत्यंत आनंद झाला. भगवान वसुदेवाच्या डोक्मयावरील टोपलीत असल्याने प्रथम त्याचे दर्शन व्हावे म्हणून यमुना उडय़ा मारू लागली. इकडे वसुदेवाच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागल्याने ते कासाविस होत होते. भगवंताने हळूच आपल्या मुखावरील पांघरूण दूर करून यमुनेला मुख दर्शन दिले. पण आता नुसत्या दर्शनाने यमुनेच्या मनाची तृप्ती होत नव्हती. माझ्या प्राणनाथांना भेटायचे आहे. यमुनेचे पाणी वाढू लागले. वसुदेव यमुनेत बुडू लागले. प्रभूने लीला केली. टोपलीतून आपला पाय हळूच  बाहेर काढला. यमुनेच्या जळाला चरणस्पर्श केला आणि हातातील कमळाचे फूल लाडक्मया यमुनेला अर्पण केले. प्रथम दर्शन आणि मीलनाचा आनंद यमुनेला मिळाला. हळूहळू पाणी कमी झाले आणि यमुनेने वसुदेवांना वाट करून दिली. वसुदेव डोक्मयावरील बालकासह सुखरूप गोकुळांत येऊन पोहोचले.

यमुनेचे पाणी भगवंताच्या दर्शनाकरिता वाढू लागले, या प्रसंगाचे स्पष्टीकरण भागवत कथाकार कांहीवेळा वेगवेगळेही देतात. काही कथाकार सांगतात की यमुनेला आपल्या हृदयात कालीयारूपी शल्य आहे हे भगवंताला दाखवायचे आहे. यमुनेच्या मनातील भावना अशी आहे-भगवंता! मला तुला आपल्या हृदयात साठवायचे आहे. पण काय करू? माझ्या या हृदयात कालीयारुपी विष आधीच वस्ती करून आहे. ते पहा! या विषाचा तूच नायनाट केल्याशिवाय या हृदयात तुला कसे साठवू? आपल्या मनातही काम, क्रोध, मद, मोह, मत्सर इत्यादी विषारी साप नांदतच आहेत. त्यांना हाकलल्याशिवाय प्रभू कसे तिथे वस्तीला येतील. पण हे भुजंग काही सामान्य नव्हेत. हे अत्यंत बलाढय़ आहेत. यांना हाकलून लावणे हे सामान्य काम नव्हे. यांच्याशी लढाई करून आपल्याला जिंकता येत नाही. ही कुस्ती समतूल्य पहिलवानाबरोबर नाही. या कुस्तीत आपणच चीतपट होणार. यांना समजावून, गोंजारूनही दूर सारता येत नाही. यांना घालवण्याचा एकमेव उपाय म्हणजे प्रभूला शरण जावे व त्याच्यावरच यांना नष्ट करण्याची जबाबदारी सोपवावी.

– ऍड. देवदत्त परुळेकर