|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » फेरीवाल्यांचा उद्या महापालिकेसमोर ठिय्या

फेरीवाल्यांचा उद्या महापालिकेसमोर ठिय्या 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

 फेरीवाल्यांसंदर्भात तातडीने बैठक घ्या, अशी मागणी वारंवार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. मात्र, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या हट्टी भूमीकेमुळे अद्यापही बैठक घेण्यात आलेली नाही. या उलट परस्पर शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीचे आर.के. पोवार यांनी केला. फेरीवाला कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. गुरुवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता मनपाच्या कारवाईच्या विरोधात सर्व फेरीवाले व्यवसाय बंद ठेऊन मोर्चा काढून महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    आयुक्त डॉ. चौधरी यांनी पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या समवेत शहरातील अतिक्रमणावर कारवाई संदर्भात बैठक घेतली. यावेळी सोमवार पासून दि. 27 मनपा व पोलीस प्रशासन यांची संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय झाला. यासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीची महाराणा प्रताप चौकात माजी महापौर आर.के. पोवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

   कृती समितीचे आर.के. पोवार म्हणाले, आयुक्त डॉ. चौधरी यांच्याकडे फेरीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात बैठक घ्या, अशी मागणी केली. मात्र, त्यांनी अद्यापही बैठक घेतली नाही. महापौर हसीना फरास यांनी यासंदर्भात फोन केल्यानंतरही त्यांनी फोन उचलला नाही. फेरीवाल्यांना विश्वासात न घेताच कारवाईचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर अर्ज करूनही बहुतांशी फेरीवाल्यांना अद्यापही बायोमेट्रीक कार्ड दिलेले नाही. राष्ट्रीय हॉकर्स झोन करण्यात आलेले नाहीत. असे असताना आयुक्तांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

  महापालिकेच्या फेरीवाल्यांवरील कारवाईच्या विरोधात गुरुवारी (दि.23) सकाळी 11 वाजता शिवाजी चौक येथून मोर्चाने जाऊन महापालिकेसमोर ठिय्या आदोलन करण्याचा निर्णय झाला. फेरीवाले, प्रशासन यांच्यासमवेत बैठक घेण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. फेरीवाल्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर वेळप्रसंगी फेरीवाले आपला व्यवसाय बेमुदत बंद करतील, असा इशाराही आर.के. पोवार यांनी दिला. दिलीप पोवार यांनी महापालिकेने फेरीवाल्यांच्या कायदानुसार काम करावे, अशी मागणी केली. यावेळी प्र.द.गणपुले, माजी नगरसेवक अशोक भंडारी, सुरेश जरग, किशोर गवळी, नजीर देसाई, रघु कांबळे, मारुती भागोजी, विजय नागांवकर, रमाकांत उरसाल, राजू महाडिक आदी उपस्थित होते.

  आयुक्त महापालिकेचे मालक नाहीत : सुभाष वोरा

 शहरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यापूर्वी नेमके अतिक्रमण कोणती आहेत हे ठरविणार कोण असा सवाल ज्येष्ठ नेते सुभाष वोरा यांनी केला. फेरीवाल्यांचे म्हणणे ऐकुन न घेताच आयुक्तांची कारवाई बेकायदेशीर असणार आहे. परस्पर निर्णय घेणारे आयुक्त महापालिकेचे मालक नाहीत. फेरीवाल्यांवर कारवाई केलेली खपवून घेणार नाही. महापालिकेच्या विरोधात आक्रमक आंदोलन केले जाईल, असा इशारा वोरा यांनी दिला.

Related posts: