|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » असहिष्णुतेला मोदींची मूकसंमती : पृथ्वीराज चव्हाण

असहिष्णुतेला मोदींची मूकसंमती : पृथ्वीराज चव्हाण 

ऑनलाईन टीम / पुणे  :

कुठे खाण्यावर बंधने लादली जातात. तर कुठे चित्रपट पाहण्यावर बंदी घातली जाते. अशा असहिष्णू वातावरणातही पंतप्रधान मोदी मौन बाळगणे पसंत करतात. याचा अर्थ त्यांची याला मूकसंमतीच असली पाहिजे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पंतप्रधानांवर टीका केली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते. पद्मावती चित्रपटाला झालेला विरोध व विविध राज्यांनी या चित्रपटाबाबत घेतलेली बंदीची भूमिका याबाबत चव्हाण यांनी नापसंती व्यक्त केली. ते म्हणाले, सध्या काय चाललेय कळत नाही. कुणी काय खायचे, हेही आता दुसरेच कुणीतरी ठरवू पाहत आहे. चित्रपटासारख्या माध्यमाबाबतही अशीच स्थिती आहे. खरेतर सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन व्हायला हवे. मात्र, सेन्सॉरऐवजी दुसरेच कुणी बंदीचा निर्णय घेत असेल, तर ते योग्य मानता येणार नाही. हे काय किंवा गोरक्षणाच्या नावाखाली माणसे मारली जाणे, गौरी लंकेश यांच्यासारख्या पत्रकाराची हत्या होणे काय, हा सगळा असहिष्णुतेचाच प्रकार आहे. मात्र, एरवी विविध विषयांवर ट्विट करणारे मोदी यावर मौन बाळगतात. म्हणजे त्यांची याला मूकसंमती आहे, असाच अर्थ होतो. मोदी हे संघाच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

बुलेट ट्रेन हा व्यवहार्य पर्याय नाही. त्यामुळे अनेक देशांनी बुलेट ट्रेनचा पर्याय स्वीकारलेला नाही. मात्र, केवळ गुजरात निवडणुकीसाठी भाजपाचा आटापिटा सुरू आहे. याऐवजी रेल्वेच्या मूलभूत विकासासाठी लक्ष का देत नाही, असा सवाल करतानाच स्मार्ट सिटी हा उपाय होऊ शकत नाही. हा फसवा प्रयोग आहे. त्याऐवजी नवीन सुनियोजित शहरांचे निर्माण करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मूडीज्चे मानांकन स्वागतार्ह आहे. मात्र, त्यामुळे अर्थव्यवस्था बदलली, असे नाही. याबाबतचे अन्य दोन संस्थांचे अहवाल काही अनुकूल नाहीत. त्यामुळे हुरळून जाण्याचे कारण नाही, असा सल्ला देतानाच पॅराडाईजप्रकरणात राजकारणी, बडे उद्योजक मोठय़ा प्रमाणात आहेत. आता यावर मोदींनी बोलले पाहिजे. काळा पैसा निवडणूक जुमला होता, असे त्यांचेच अध्यक्ष म्हणतात. त्याची प्रचिती सध्या येत आहे.

गुजरात निवडणूक व पक्ष निवडणुकीचा संबंध नाही

राहुल गांधी यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिमंडळात येण्यास नकार दर्शविला होता. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही पंतप्रधानपद स्वीकारण्याची सूचना त्यांना केली होती. मात्र, संघटनेत काम करण्यातच रस असल्याने त्यांनी कोणतेही पद स्वीकारले नाही, याकडे लक्ष वेधतानाच गुजरात निवडणूक व पक्ष निवडणूक याचा कोणताही संबंध नाही. आयोगाच्या सुचनेनुसारच कार्यवाही होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जीएसटी प्रक्रिया क्लिष्ट नसावी, असे आमचे मत आहे. तर सहकारी चळवळ ही ग्रामीण व्यवस्थेचा कणा असल्याने ती टिकली पाहिजे, अशी आशा व्यक्त करतानाच राणे भाजपाच्या पाठिंब्याने उभे राहिले, तर सर्व पक्ष एकत्र येतील, असे चव्हाण म्हणाले. लाभार्थी जाहिरातीतील माणसे, छायाचित्रे खोटी असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

Related posts: