|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कागलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी

कागलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी 

प्रतिनिधी /कागल :

येथील दि. कागल को-ऑप बँकेचे स्व. राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप बँक असे नामकरण करण्यात येत आहे. या नामकरण सोहळ्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम शनिवार दि.  25 रोजी दुपारी 12 वा. येथील गहिनीनाथनगर येथील भव्य जागेत आयोजित केला आहे. 5 एकर जागेत मंडप घालून त्याठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे हे स्वतः जातीने लक्ष देवून सर्व यंत्रणा हाताळीत आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्यादृष्टीने जोरदार नियोजन केले आहे.

या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सुरेश हाळवणकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शशिकला जोल्ले यांच्यासह भाजपचे जिह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कागलमध्ये शनिवारी नगरपालिकेच्या शाहू             क्रीडा संकुलाच्या मैदानावर हेलीपॅड तयार करण्यात आले आहे. याठिकाणी  हेलिकॉप्टरने त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर शाहू साखर कारखान्याच्या                    श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवनात कांही काळ थांबणार आहेत. त्यानंतर ते थेट कार्यक्रमस्थळी रवाना होणार आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी मैदान तसेच सर्व सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. गेल्यावर्षी कारखाना शाळेच्या मैदानावर शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचा भव्य मेळावा झाला होता.या मेळाव्यासही तालुक्यातून मोठय़ा प्रमाणात लोकांनी उपस्थिती लावली होती. यावेळीही हा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात व्हावा होण्याच्यादृष्टीने समरजितसिंह घाटगे यांचे प्रयत्न आहेत. त्यानुसार भाजपचे सर्वच कार्यकर्ते मोठय़ा ताकदीने कामाला लागले आहेत. बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील व त्यांचे सर्व संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी, कर्मचारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

 

 

 

Related posts: