|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भाजप आघाडीला खाली खेचल्याशिवाय थांबायचे नाही

भाजप आघाडीला खाली खेचल्याशिवाय थांबायचे नाही 

प्रतिनिधी /सेनापती कापशी  :

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा एक भाग म्हणून 27 नोव्हेंबर रोजी कागल येथे तहसीलदार कार्यालयावर व 29 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रेने जावून विविध मागण्यांचे निवेदन द्यावयाचे आहे. भाजपप्रणीत सरकारला सत्तेवरुन खाली खेचल्याशिवाय आता थांबायचे नाही, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, गेल्या तीन वर्षापासून सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. सातत्याने त्यांनी केवळ पोकळ आश्वासने देवून जनतेची दिशाभूल केली आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, छोटे-मोठे उद्योग व्यावसाईक व इतर सर्वच घटक सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. नोटाबंदी व जीएसटीच्या अतितायी निर्णयाने देशाची व राज्याची अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नेमण्यात आलेले खासगी क्षेत्रातील विशेष कार्यकर्त्यांनी राज्याचे प्रशासन ताब्यात घेतले आहे.

राज्यामध्ये गरजेनुसार आवश्यक असणारे विषय अग्रक्रमाने न घेता हे शासन बुलेट ट्रेन व समृध्दी महामार्ग यासारख्या अवाढव्य योजनांकडे संपूर्ण महसूल वळविला जात आहे. असा आरोप करुन आमदार मुश्रीफ म्हणाले, या सरकारला सत्तेवरुन खाली खेचल्याशिवाय गत्यंतर नाही. यावेळी त्यांनी कर्जमाफी योजनेअंतर्गत सर्व शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी देवून सातबारा कोरा करावा, गेल्या तीन वर्षात शेतीमालाच्या निर्यातीत 64 हजार कोटी रुपयांची घट होवून आयात 65 हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. शेतकरी विरोधी व्यापक धोरणांमुळे गेल्या तीन वर्षात एकाही पिकाला हमीभावाइतका बाजारभाव मिळाला नाही. अशा विविध 13 प्रश्नांचे वाचन आमदार मुश्रीफ यांनी केले.

Related posts: