|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चौथ्या दिवशीही मोजणी बंद

चौथ्या दिवशीही मोजणी बंद 

रिफायनरी विरोधी आंदोलन

गांधीगिरी आंदोलनापुढे प्रशासन हतबल

 

प्रतिनिधी /राजापूर

तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीच्या जमीन मोजणीच्या ठिकाणी गुरूवारी चौथ्या दिवशीही प्रकल्प विरोधकांनी ठाण मांडल्याने मोजणीचे काम बंदच राहीले. दरम्यान प्रकल्प विरोधकांच्या गांधीगिरामुळे मोजणीसाठी दाखल झालेले अधिकारी पुरते हतबल झाले आहेत.

नाणार व परिसरातील 14 गावामध्ये होऊ घातलेल्या रिफायनरीसाठी सोमवारपासून मोठया पोलीस बंदोबस्तात सोमवारपासून जमीन मोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र पहिल्या दिवसापासूनच प्रकल्प विरोधकांनी मोजणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रखर विरोध झाल्याने दुसऱया दिवशी पोलिसांनी प्रकल्प विरोधकांची धरपकड सुरू केली. मात्र जराही न डगमगता विरोधकांनी आपले गांधीगिरी मार्गाने पुकारलेले आंदोलन सुरूच ठेवले आहे.

जोपर्यंत जमीन मोजणीचे काम रद्द झाल्याबाबत फतवा येत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले आहे. गुरूवारी चौथ्या दिवशी नाणार वगळता अन्य ठिकाणी मोजणीचे काम ठप्प होते. अधिकारी, कर्मचारी मोजणीच्या ठिकाणी सकाळ पासून हजर झाले होते. मात्र प्रकल्प विरोधकडी मोक्याच्या ठिकाणी उपस्थित झाल्याने प्रत्यक्ष मोजणी करता आली नाही. विरोधकांच्या गांधीगिरीमुळे प्रशासन पुरते हतबल झाले आहे.

रामेश्वर न्यायहक्क संरक्षण संघटनेचा पाठींबा

दरम्यान रिफायनरी विरोधातील आंदोलन दिवसेंदिवस तापत चाललेले असताना गुरूवारी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील रामेश्वर न्यायहक्क संरक्षण संघटनेच्या एका कमिटीने येथील प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱयांची भेट घेत या आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवला आहे. या संघटनेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्रकल्प बाधित गावासह परिसरातील गावांमधील ग्रामस्थांचा समावेश आहे.

राजकीय व्यक्तींचे नेतृत्व नको, सहकार्याबद्दल धन्यवाद

रिफायनरी विरोधात जेव्हा प्रकल्प विरोधी संघटना स्थापन झाली तेव्हाच कोणत्याही राजकीय पक्षाला वा नेत्याला या लढय़ात सामावून न घेण्याचे ठरले होते. या पार्श्वभूमीर दोन दिवसापूर्वी नाणारमध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी या मोजणीला न्यायालयाची स्थगिती आणण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी कार्यवाहीही सुरू केली होती. मात्र गुरूवारी कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या तातडीच्या बैठकीत राणेंसह अन्य कोणत्याही राजकीय नेत्याचे कोणतेही नेतृत्व स्विकारायचे नाही असा निर्णय घेण्यात आला. सध्या चालू असलेल्या मोजणीच्या प्रक्रियेला गाव व मुंबईतील संघटना यांनी संयुक्तरित्या स्वबळावर या मोजणीकामी स्थगिती आणण्याचे ठरवले आहे. मात्र या लढय़ाला ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांना यावेळी धन्यवाद देण्यात आले.