|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कुवारबावमधील भुसंपादन प्रक्रियेला स्थगिती

कुवारबावमधील भुसंपादन प्रक्रियेला स्थगिती 

रत्नागिरी मिऱया-नागपूर महामार्ग चौपदरीकरण

व्यापारी संघाच्या आक्रमकतेमुळे निर्णय

30 मीटर रुंदीकरणावरच संघ ठाम

कुवारबाव व्यापाऱयांचा कडकडीत बंद

बांधकाममंत्र्यांची घेणार भेट

पुढील प्रक्रिया 11 डिसेंबरनंतरच

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी मिऱया-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करताना कुवारबाव बाजारपेठेत 30 मीटरचेच रूंदीकरण करण्यात यावे या मागणीवर व्यापारी संघ ठाम राहीला आहे. गुरूवारी व्यापाऱयांनी पाळलेला बंद व घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनाकडून तुर्तास 11 डिसेंबरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया स्थागित करण्यात आली आहे. दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी महसूल व बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संभाव्य रत्नागिरी दौऱयावेळी व्यापारी संघातर्फे चर्चा करून पुढील भुमिका निश्चित करण्यात येणार आहे.

कुवारबाव येथे महामार्ग रुंदीकरणासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला व्यापारी संघाने बुधवारीही जोरदार आक्षेप घेत भूसंपादनाची प्रक्रियाच बंद पाडली. 45 मीटरचे रुंदीकरण न करता दोन्ही बाजूला 15-15 मीटरचेच रुंदीकरण करावे अशी व्यापारी संघाची मागणी आहे. मात्र प्रशासनाने 45 मीटर रुंदीकरणाची भूमिका घेतल्याने व्यापाऱयांनी आक्रमक होत संपूर्ण कुवारबाव बाजारपेठ बंद ठेवत निषेध व्यक्त केला.

बुधवारी प्रांताधिकारी अमित शेडगे व प्रशासनातील अधिकाऱयांनी प्रत्यक्ष भूसंपादनाच्या ठिकाणी उपस्थित राहून व्यापाऱयांचे म्हणणे जाणून घेतले. मोजणीबाबत जरी नोटीसा दिल्या असल्या तरीही आमच्या जागेवर प्रशासनाने अतिक्रमण केल्यासारखे असल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला 15-15 मीटर जागा सोडण्यास आम्ही तयार आहोत पण त्यापेक्षा अधिक रूंदीकरण नको अशी भुमिका त्यांनी मांडली. सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील हे रत्नागिरी दौऱयावर येण्याची शक्यता असून त्यांची भेट घेऊन व्यापारी आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया 11 डिसेंबरपर्यंत पुढे ढकण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. व्यापारी संघाचे कार्याध्यक्ष निलेश लाड, अध्यक्ष सुनिल साळवी, माजी सरपंच राजू तोडणकर, सुधाकर सुर्वे, प्रभाकर खानविलकर यांच्यासह बहुसंख्येने व्यापारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

फेब्रुवारीपर्यंत भूसंपादन गरजेचे

रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी होणाऱया रुंदीकरणाची प्रक्रिया येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, त्यामुळे ही प्रक्रिया वेगाने हाती घेण्यात आल्याचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी सांगितले. या महामार्गासाठी साळवीस्टॉप येथे 30-30 असे एकूण 60 मीटरचे रुंदीकरण प्रक्रिया पूर्णत्वाला गेली आहे. पानवल दरम्यान 90 मीटरचे भूसंपादन करण्यात आले. त्यामध्ये 60 मीटरचे रुंदीकरण केले जाणार आहे. याठिकाणचा मार्ग तयार करताना दरडीचा धोका लक्षात घेता संरक्षक भिंत आदी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. कुवारबाव दरम्यानच्या मार्गावर बाजारपेठ असल्याने 45 मीटरचे रुंदीकरण अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts: