|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आणखी एका पाटीदार नेत्याचा भाजपवर आरोप

आणखी एका पाटीदार नेत्याचा भाजपवर आरोप 

हार्दिक पटेलचा माजी सहकारी आणि पाटीदार नेता निखिल सवानी याने भाजपवर गंभीर आरोप केला. हार्दिकप्रमाणेच बनावट सीडी तयार करून ती प्रसारित करण्याची धमकी भाजपने दिल्याचा दावा सवानी यांनी केला. अमित शाह यांचे सहकारी मुकेश पटेल यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही सवानीने सांगितले.

पाटीदार समुदाय भाजपसोबत असल्याचा खोटा दावा केला जातोय. भाजपमध्ये प्रवेश कर, अन्यथा हार्दिकप्रमाणेच तयार केलेली सीडी जगासमोर आणली जाईल अशी धमकी देण्यात आली. मला काहीही झाल्यास मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि भाजपचे नेते त्याला जबाबदार असतील. तसेच माझ्या जीवाला काहीही बरेवाईट झाले तर मुकेश पटेल यांची चौकशी केली जावी. धमक्या मिळत असल्याने सुरत सोडावे लागल्याचा दावा सवानी याने केला.

रेशमा आणि वरुण पटेल हे दोघेही मनाने पाटीदार आंदोलनासोबत आहेत, परंतु त्यांच्यावर दडपण आणले जात असावे. भाजप दबावाचे राजकारण करत आहे. हनी ट्रप करून मला अडकविण्याचा प्रयत्न होतोय. पाटीदार कार्यकर्त्याला संपविण्यासाठी भाजप गलिच्छ मार्गांचा वापर करत आहे. पाटीदार समुदाय भाजपला पराभूत करणारच. पाटीदारांना आरक्षण मिळवून देणे हेच आमचे लक्ष्य असल्याचे सवानीने म्हटले.

काँग्रेसने सत्ता आल्यावर आरक्षण दिले नाही तर त्याच्या विरोधात आमची लढाई सुरू राहील. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचे उद्गार सवानीने काढले. भाजपमध्ये सामील झालेल्या सवानीने 15 दिवसातच पक्षाला रामराम ठोकला होता.