|Friday, October 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ब्रिटनमध्ये पद्मावतीच्या प्रदर्शनाला मंजुरी

ब्रिटनमध्ये पद्मावतीच्या प्रदर्शनाला मंजुरी 

वृत्तसंस्था /लंडन :

वादग्रस्त चित्रपट पद्मावतीच्या भारतातील प्रदर्शनाला अद्याप सेन्सॉर मंडळाकडून मंजुरी मिळालेली नाही, परंतु ब्रिटनमध्ये कोणतेही दृश्य न हटविता चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी मिळाली. ब्रिटिश सेन्सॉर मंडळाने दीपिक पदूकोन आणि रणवीर सिंग अभिनित या चित्रपटाला 12 अ प्रेक्षकांसाठी (12 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची मुले, त्यांच्या पालकांसोबत पाहू शकतात.) संमती दिली. ब्रिटनमध्ये पद्मावती चित्रपटाचे 1 डिसेंबरपासून प्रदर्शन केले जाईल असे मानले जात आहे. ब्रिटनमधील चित्रपटाचे होणारे प्रदर्शन रोखण्यासाठी करणी सेनेने कंबर कसली आहे. तेथील पदाधिकाऱयांशी या मुद्यावर चर्चा केली जाईल असे संघटनेने सांगितले.

चित्रपटनिर्मात्यांनी ब्रिटनमधील प्रदर्शनासाठी अगोदरच अर्ज केला होता. भारतात या चित्रपटाला आक्षेपार्ह ठरवत राजपूत समुदाय तसेच करणी सेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच अनेक राज्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाही अशी घोषणा केली आहे.

प्रमाणपत्रासाठी निर्मात्यांनी केलेल अर्ज अपूर्ण असल्याचे सांगत भारतातील सेन्सॉर मंडळाने तो परत पाठविला होता. पद्मावती चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप राजपूत समुदायाकडून होतोय. चित्रपटात अलाउद्दीन आणि पद्मावती यांच्यात आक्षेपार्ह दृश्य दाखविण्यात आल्याचा आरोप करणी सेनेने केला. तर चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी हा आरोप फेटाळला आहे. हा चित्रपट अगोदर 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार होता, परंतु निर्मात्यांनी स्वतःच माघार घेत प्रदर्शन लांबणीवर टाकले आहे.

Related posts: