|Saturday, January 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ऑस्ट्रेलिया : चीनशी दुरावा, भारताशी जवळीक

ऑस्ट्रेलिया : चीनशी दुरावा, भारताशी जवळीक 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

ऑस्ट्रेलियाच्या विदेश धोरणावर मागील 14 वर्षांमध्ये पहिली श्वेतपत्रिका काढण्यात आली. यात चीनपासून वाढते अंतर आणि भारताशी वाढणारे सहकार्य प्रतिबिंबित होते. चीनचा सामना करण्यासाठी अमेरिका, जपान आणि भारताला ऑस्ट्रेलियाची साथ मिळेल याचे संकेत श्वेतपत्रिकेतून मिळाले.

जागतिक व्यापारासाठी महत्त्वपूर्ण दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या अरेरावीनंतर हिंदी महासागरात देखील त्याच्या सैन्य हालचाली वाढत असल्याने पूर्ण जगाला चिंता सतावत आहे. अलिकडेच फिलीपाईन्सच्या राजधानीत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या अधिकाऱयांची बैठक झाली, यात हिंद-प्रशांत क्षेत्रातील हितसंबंध जपण्यावर एकमत व्यक्त झाले. भारत, जपान आणि अमेरिका यांच्यात होणाऱया मालाबार सैन्याभ्यासात ऑस्ट्रेलियाचा समावेश होण्याची शक्यता आहे. चारही देश एकत्र येण्यावर चीनने चिंता व्यक्त केली होती.

ऑस्ट्रेलियाच्या विदेश धोरणाची श्वेतपत्रिका गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात आशिया-प्रशांतऐवजी हिंद-प्रशांत शब्दाचा पुन्हापुन्हा वापर करण्यात आला. या क्षेत्राचे स्थैर्य अमेरिका आणि चीनच्या संबंधांवर निर्भर असल्याचे नमूद करण्यात आले. ऑस्ट्रेलियाला नेहमीच अमेरिकेचा अत्यंत जवळचा सैन्य सहकारी मानले जाते. ऑस्ट्रेलियाचे चीनसोबत दृढ आर्थिक संबंध राहिले आहेत. काही काळापासून ऑस्ट्रेलिया आणि चीनच्या संबंधांमध्ये दुरावा दिसून येतोय.

चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वन बेल्ट वन रोडवर देखील ऑस्ट्रेलियाने फारसा उत्साह दर्शविलेला नाही. चीनचे सामर्थ्य अमेरिकेशी मिळतेजुळते असून काही प्रकरणात ते अधिक आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात स्वतःच्या हितसंबंधांना बळ मिळावे असे चीन इच्छितो. चीनने स्वतःच्या बळाचा वापर स्थैर्य वाढविण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कायद्यांना बळ देणे आणि छोटय़ा देशांच्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी करावा. अमेरिकेने या क्षेत्राशी जोडलेले रहावे अशी ऑस्ट्रेलियाची इच्छा असल्याचे श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले.

Related posts: