|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राज्यात शेतकऱयांच्या आत्महत्येत वाढच

राज्यात शेतकऱयांच्या आत्महत्येत वाढच 

प्रतिनिधी /बेळगाव :

शेतकरी देशाचा कणा असला तरी शेतकऱयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. पिकाला योग्य हमीभाव न मिळाल्याने दुष्काळ, अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने व कर्ज आदी विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. याचा परिणाम मात्र त्यांच्या कुटुंबीयांवर होत आहे.

शेतकऱयांच्या आत्महत्येची आकडेवारी पाहता बेळगाव जिल्हय़ाचा पाचवा क्रमांक लागत आहे. सन 2016-17 सालात एकूण 50 शेतकऱयांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

एकीकडे अतिवृष्टी-अनावृष्टी, नैसर्गिक असमतोल आदींचा परिणाम पिकांवर होत आहे. जानेवारी 1 पासून आतापर्यंत राज्यात एकूण 750 शेतकऱयांनी आत्महत्या केली आहे. चिक्कमंगळूर जिल्हय़ात सर्वाधिक शेतकऱयांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

सदर आत्महत्येची आकडेवारी पाहता आत्महत्येची प्रमुख 4 कारणे असल्याचे उघडकीस येत आहे. यामध्ये दुष्काळ, पाण्याची समस्या, पावसाचे प्रमाण, जंगली-रानटी जनावरांमुळे वेळोवेळी होत असलेले पिकांचे नुकसान आदी प्रमुख कारणे आहेत.