|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » ‘एस ऍण्ड पी’कडून भारताचे मानांकन कायम

‘एस ऍण्ड पी’कडून भारताचे मानांकन कायम 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

स्टॅण्डर्ड आणि पूअर्स या अमेरिकेच्या मानांकन संस्थेने भारताच्या मानांकनात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारकडून वित्तीय तूट घटविण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली असून भारताचे बीबीबी उणे हे मानांकन कायम ठेवले. सरकारकडून करण्यात येणाऱया आर्थिक सुधारणांना सकारात्मक म्हटले आहे.

एस ऍण्ड पीने भारताचे मानांकन जानेवारी 2007 मध्ये बदलले असून बॉन्डसाठी बीबीबी उणे सर्वात कमी आहे. यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेला स्थिर असे मानांकन देण्यात आले होते. 2009 मध्ये नकारात्मक बदल करण्यात आला असून 2010 मध्ये तो पुन्हा स्थिर म्हणण्यात आला होता. यानंतर 2012 मध्ये नकारात्मक आणि 2014 मध्ये मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तो स्थिर ठेवण्यात आला आहे. यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 14 वर्षानंतर मूडीजने भारताच्या मानांकनात सुधारणा केल्याने सर्वांचे लक्ष एस ऍण्ड पीकडे होते.

भारताचे मानांकन सुधारण्यासाठी वित्तीय तूट कमी करण्याची आवश्यकता आहे, असे ऑक्टोबरमध्ये एस ऍण्ड पीने म्हटले होते. मात्र आता जीएसटीमध्ये काही वस्तूंवरील दर घटविण्यात आल्याने आणि पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क घटविण्यात आल्याने मार्च 2018 पर्यंत वित्तीय तूट घटविण्याचे लक्ष्य गाठण्यास अपयश येईल असा अंदाज आहे. मार्च 2018 पर्यंत वित्तीय तूटीचे लक्ष्य जीडीपीच्या 3.2 टक्के ठेवण्याचा प्रयत्न आहे. तूट मर्यादित राहील असे सरकारला वाटते.