|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पाचव्या दिवशीही मोजणी बंदच

पाचव्या दिवशीही मोजणी बंदच 

रिफायनरी प्रकल्प विरोधकांचा दावा

प्रतिनिधी /राजापूर

तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन मोजणीच्या कामाला सोमवारपासून सुरूवात झाली. मात्र पहिल्या दोन दिवसाचा अपवादवगळता उर्वरित दिवसात जमीन मोजणीच्या कामात फारशी प्रगती झाली नाही. शुक्रवारी पाचव्या दिवशीही प्रकल्प विरोधकांनी मोजणीच्या ठिकाणी मोजणीला तीव्र विरोध करत ठाण मांडल्याने मोजणीचे काम झालेच नाही. गेल्या तीन दिवसातील जमीन मोजणीच्या कामातील प्रगती पाहता प्रशासनासमोर जमीन मोजणी रद्द करण्याची वेळ येते की काय, अशी शंका आता उपस्थित करण्यात येत आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार व परिसरातील 14 गावामध्ये होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी या जगातील सर्वात मोठय़ा प्रकल्पासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्तात सोमवारपासून जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र गेल्या दोन-तीन दिवसात मोजणीची प्रक्रिया थंडावत चालली आहे. गेल्या दोन दिवसाप्रमाणे शुक्रवारी पाचव्या दिवशीही जमीन मोजणीचे काम झाले नाही. त्यामुळे हे मोजणीचे काम गुंडाळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शुक्रवारी सकाळी मोजणीच्या कामाला प्रारंभ होत असल्याचे वाटताच प्रकल्प विरोधकांनी ही मोजणी प्रक्रिया हाणून पाडली. एका पोलीस अधिकाऱयानेही प्रकल्पाला विरोध करणाऱया महिलांना समजावून सांगत शासकीय रस्त्याची मोजणी करायला तरी द्या, अशी विनंती केली. मात्र ही मोजणी रिफायनरीसंदर्भात व याचवेळी होत असल्याने उपस्थित महिला विरोधकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे शुक्रवारी नाणारसह दत्तवाडी, पाळेकरवाडी व कात्रादेवीवाडी येथील मोजणी झाली नसल्याचा दावा प्रकल्प विरोधकांनी केला आहे.

Related posts: