|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा आज मुख्य दिवस

शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा आज मुख्य दिवस 

प्रतिनिधी /निपाणी :

येथील श्री चंद्रप्रभस्वामी बावन जिनालयास यंदा 125 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त येथील मंदिर ट्रस्टच्या नेतृत्त्वाखाली आठ दिवसांपासून विविध कार्यक्रम पार पडत आहेत. शनिवार 25 रोजी येथे शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा मुख्य दिवस असून हा दिवस ध्वजदिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्त भव्य शामियाना व कार्यक्रमांचे आयोजन करून करण्यात आले असून भाविकांचा अमाप उत्साह दिसून येत आहे. ध्वजदिवस कार्यक्रमास निपाणी शहर व परिसरातील भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

सदर शतकोत्तर रौप्यमहोत्सव आचार्यदेव श्री विजय अजितशेख सुरीश्वरजी महाराज यांच्या दिव्य सान्निध्याखाली पार पडत आहे. 16 रोजी सकाळी कुंभस्थापना, दीपकस्थापना व ज्वारारोपण होऊन महोत्सवास सुरुवात झाली आहे. महोत्सवकाळात प्रवचन, श्री पंचकल्याणक पूजा, शुक्रस्तव अभिषेक, नाटिका, शांतीधारा पाठ, आचार्यपद पूजन, श्री अढार अभिषेक, भावना, श्री अर्हद महापूजन, नवग्रह, अष्टमंगल पाटलापूजन, भव्यदिव्य वरघोडा आदी कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडले आहे.

शनिवार 25 रोजी सत्तरभेदी पूजा, फुलेचुंदडी, ध्वजा आदी महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहेत. महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री जिनसेवा मंडळ, श्री भूषणविहार सेवा ग्रुप, श्री चंद्रप्रभ श्राविका मंडळ, श्री जैन सांस्कृतिक महिला मंडळ, जैन सोशल ग्रुप यांच्यासह समाजबांधवांतर्फे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख व्यवस्था पार पाडली जात आहे. सदर महोत्सवानिमित्त भाविकांमध्ये अमाप उत्साह दिसून येत आहे. शनिवारी होणाऱया ध्वजदिवस या मुख्य कार्यक्रमास मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.