|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘झी-सारेगमप’मध्ये झळकणार रत्नागिरीच्या दोन कन्या!

‘झी-सारेगमप’मध्ये झळकणार रत्नागिरीच्या दोन कन्या! 

केतकी शेटय़े, सिद्धी बोंद्रे यांची निवड

मेगा ऑडिशनमधून अंतिम 36 मध्ये दाखल

 

अभिजित नांदगावकर /रत्नागिरी

झी-मराठी वाहिनीवरील लोकप्रिय सांगितिक कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे. गायन स्पर्धांमधील सर्वाधिक गाजलेल्या या कार्यक्रमाच्या महाराष्ट्रातील विविध केंद्रावरील ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. केंद्रावरील ऑडिशन्समधून मुंबईची मेगा ऑडिशन 23 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडली. यामधून अंतिम कार्यक्रमात निवडण्यात आलेल्या गायक कलाकारांमध्ये रत्नागिरीच्या दोन कन्यांची निवड झाली आहे. या दोघींची नावे आहेत….केतकी शेटय़े आणि सिद्धी बोंद्रे!

मुंबईत केंद्रावर 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या एकूण 2000 हून अधिक मुलांनी ऑडिशनला गर्दी केली होती. केंद्रावर होणाऱया ऑडिशनमध्ये तीन टप्प्यांतून गायक स्पर्धकांची कसोटी लागत होती. मुंबईतून केवळ 12 स्पर्धक मुंबईमध्ये होणाऱया मेगा ऑडिशनसाठी निवडण्यात आले. यामध्ये केतकीने धडक मारली. तर कोल्हापूरमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या ऑडिशनला एकूण 2000 च्या सुमारास स्पर्धक होते. या ठिकाणीही ऑडिशनचे तीन टप्पे पार करत सिद्धी बोंद्रेने मुंबईच्या मेगा ऑडिशनपर्यंत धडक मारली. कोल्हापूरहून 20 जणांची निवड मुंबईतील मेगा ऑडिशनसाठी करण्यात आली.

मेगा ऑडिशनला महाराष्ट्र, गोव्यातील विविध केंद्रावरून 81 स्पर्धक निवडण्यात आले होते. यातून केवळ 36 जणांची निवड रंगारंग लोकप्रिय कार्यक्रमात होणार होती. या ठिकाणी खरी कसोटी लागणार होती. येथे या दोघींनी आपल्या सुरांची उत्तम पखरण करत संगीत संयोजक कमलेश भडकमकर व वाहिनीच्या इतर परीक्षकांची पसंती मिळवली आणि केतकी, सिद्धी आता ‘सारेगमप’ या कार्यक्रमात झळकणार आहेत. लवकरच हा कार्यक्रम झी-मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे.

‘सारेगमप’मध्ये निवड झालेली केतकी पूर्वाश्रमीची केतकी शेटय़े म्हणून रत्नागिरीची कन्या, तर आता सांगलीची सून म्हणून केतकी चैतन्य झाली आहे. केतकी मूळची राजापूर असून या ठिकाणी प्राथमिक सांगितिक शिक्षण तिने गुरू बाळकृष्ण केळकर यांच्याकडे घेतले. त्यानंतर ती इयत्ता 9 वीपासून रत्नागिरीतील प्रसिद्ध शास्त्राrय गायिका मुग्धा भट-सामंत यांच्याकडे गायनाचे शिक्षण घ्यायला सुरूवात केली. तर आता ती पं.अवधूत कशाळकर यांच्याकडे गायनाचे धडे गिरवत आहे.

केतकीला आई–वडिलांचा भक्कम पाठेंबा

केतकीला वडील देवेंद्र शेटय़े तसेच आई नीता यांचा गायनासाठी भक्कम पाठिंबा लाभला. त्या जोरावर तिने विविध स्पर्धांतून पारितोषिके प्राप्त केली आहेत. तसेच नुकतेच तिने ‘सं. मत्स्यगंधा’ या संगीत नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवरही पदार्पण केले आहे. गायनाव्यतिरिक्त ती राज्यस्तरावरील जलतरणपटू म्हणून नावाजलेली आहे. आता तिने आपले संपूर्ण लक्ष गायनावर केंद्रीत केले आहे.

सिध्दीला आजोबांपासून मिळाली गायनाची प्रेरणा

तर रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणारी दुसरी कन्या म्हणजे सिद्धी बोंद्रे! देवरूख तालुक्याची मुळची असलेली सिद्धी रत्नागिरीतील एक प्रसिद्ध गायिका आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून ती गायनाचे धडे गिरवत आहे. सिद्धीही गायिका मुग्धा भट-सामंत यांची शिष्या असून त्यांच्याकडे सुमारे 2 वर्षे तिने गायनाचे धडे गिरवले. आता ती रत्नागिरीतील प्रसिद्ध शास्त्राrय गायक प्रसाद गुळवणी यांच्याकडे सांगितिक शिक्षण घेत आहे. तिला आजोबांकडून संगीत नाटकाची आवड निर्माण झाली आणि विविध मैफलीतून तिचा सहभाग असतो.

Related posts: