|Thursday, October 18, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हाफिजची वळकटी उचलाच!

हाफिजची वळकटी उचलाच! 

गेले 10 महिने आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तान सरकारच्या नजरकैदेत असलेला जगातील एक मोठा दहशतवादी हाफिज सईदला पाकिस्तान पूर्णतः पाठीशी घालत आलेले आहे. पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी आसरा घेत आहेत. जगात कुठेही दहशतीचा हल्ला झाल्यानंतर अंगुलीनिर्देश पाकिस्तानकडे जाण्याचे मूळ कारण म्हणजे पाकिस्तान ही दहशतवाद्यांची आश्रयभूमी आहे. भारताने हे वारंवार आंतरराष्ट्रीय स्तरावर जगाला पुराव्यानिशी दाखवून दिलेले आहे. जेव्हा भारत जगासमोर ओरडून सांगत होता तेव्हा अमेरिका इंग्लंडसह सारे देश भारताकडे कानाडोळा करीत होते. मात्र प्रत्यक्षात जेव्हा दहशतवाद्यांचे प्रताप या प्रगत राष्ट्रांनी अनुभवले तेव्हा कुठे या राष्ट्रांना जाग आली. जगात दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे होणारे हाल भारताएवढे कुणी सहन केले नसतील. आज साऱया जगाला कळून चुकले  आहे की पाकिस्तान ही दहशतवाद्यांची भूमी आहे. जगातील सर्वात खतरनाक दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान हा आसरा आहे. एवढे असूनदेखील चीन हे प्रगत राष्ट्र केवळ भारतद्वेषाने पछाडलेले आज पाकिस्तानचे समर्थन करत आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशत हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेला पाकिस्तानचा क्रूरकर्मा दहशतवादी हाफिज सईद याच्यावर कारवाई करण्यास पाकिस्तान तयार नव्हता. भारतावर अनेकवेळा दहशतवादी हल्ले घडविण्यात हा क्रूरकर्माच जबाबदार होता. पाकिस्तानला हे माहीत असून देखील पाकिस्तानने त्याच्या विरुद्ध कारवाई केली नाही. पाकिस्तानमध्ये सरकार  कोणाचेही असो, ते दहशतवाद्यांच्या आशीर्वादावरच चालत असते. जागतिक पातळीवर भारताने जे काही पुरावे सादर केले त्यातून जगाला हा हाफिज सईद म्हणजे कोण याचा पत्ता लागला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर आलेल्या दबावाने पाकिस्तान सरकारने जानेवारी 2017 मध्ये हाफिज सईदला नजरकैदेत ठेवले. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या न्यायालयाने त्याची सुटका केली कारण पाकिस्तान सरकार त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे सादर करू शकलेला नाही. पाकिस्तानचे हे खेळ अत्यंत घातक आहेत. भारताने त्याविरुद्ध केलेला त्रागा आणि अमेरिकेने व्यक्त केलेला संताप पाकिस्तानच्या अंगलट येईल. पाकिस्तान आपल्या खिशात जे साप बाळगतोय ते अत्यंत विषारी आहेत. हे साप एक दिवस पाकिस्तानवरच उलटतील. अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्येही जे दहशतवाद्यांचे हल्ले होत आहेत, ते सारे हाफिजचेच शिष्य आहेत. शुक्रवारी पाकिस्तान सरकारच्या नजरकैदेतून बाहेर आलेल्या हाफिजने भारताविरुद्ध गरळ ओकण्यास प्रारंभ केला. गिरें तो भी टांग उपर म्हणतात तसा हा प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय दबावाखाली आपल्याला जे नजरकैदेत ठेवण्यात आले त्यास भारत जबाबदार असून आपले युद्ध हे भारताशी आहे, असे सांगणाऱया या क्रूरकर्म्याला भारतानेही प्रत्युत्तर दिलेले आहे. मात्र हाफिज हा अत्यंत घातक दहशतवादी आहे. काश्मिरसाठी पुन्हा जिहाद सुरू करण्याची त्याने केलेली घोषणा कदाचित पाकिस्तानचे मनोबल वाढविणारी असेलही. परंतु भारताने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सईदवर कारवाई करण्यासाठी एकतर दबाव आणला पाहिजे, नाहीतर सर्जिकल स्ट्राईकद्वारे हाफिजचा खात्मा तरी केला पाहिजे. दहशतवाद हा अनेक देशांना पोखरत आहे. पाकिस्तानचे सरकार हे दहशतवाद्यांसाठी अत्यंत पोषक आहे, असे म्हटले जाते. वस्तुतः पाकिस्तानचे सरकार हेच मुळी दहशतवाद्यांच्या आशीर्वादाने व तत्त्वानुसार चालते. नजरकैदेतून सुटल्यामुळे हाफिज सध्या माकडउडय़ा मारत आहे. परंतु, करावे तसे भरावे असे म्हटले जाते. भारतही काही कमी नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला इंग्लंड, जपान व अमेरिकेची साथ निश्चित आहे. कित्येक मुस्लीम राष्ट्रे देखील भारताचीच बाजू मांडणारी आहेत. तेव्हा सारा डाव एक दिवस पाकिस्तानवरच उलटेल. वस्तुस्थिती पाकिस्तानच्या लक्षात येण्यास काही विलंब लागणार खरा, परंतु त्यावेळी वेळ गेलेली असेल. हाफिज लाहोरला स्वतःच्या घरातच नजरकैदेत होता. ही नजरकैद लाहेरच्या उच्च न्यायालयाने गुरुवारी रात्री संपुष्टात आणली कारण न्यायालयाने दिलेल्या महिनाभराच्या मुदतीतही पाक सरकार त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे सादर करू शकत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. गुरुवारी रात्री सुटकेनंतर त्याच्या घरासमोर त्याच्या अनुयायांनी धुमाकूळ घालून हाफिजचे समर्थन केले व उपस्थितांसमोर बोलताना त्याने भारताला धडा शिकवू असे जे निवेदन केले ते अत्यंत घातक आहे. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानवरच आता कारवाई करण्याची गरज आहे. मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणारा क्रूरकर्मा डॉन दाऊद इब्राहीम हाही पाकिस्तानात आश्रय घेऊन बसलेला आहे. जगातील जेवढे म्हणून दहशतवादी असतील त्यांचे पाकिस्तानशी असलेले कनेक्श्न काय दर्शविते? पाकिस्तान ही दहशतवादासाठी सुपिक भूमी आहे यावर शिक्कामोर्तब करते. आता वेळ आलेली आहे पाकिस्तानवरच कारवाई करण्याची. हाफिज सईद भारताला धमकी देतो ती कोणाच्या जीवावर? पाकिस्तान आणखी किती वर्षे दहशतवाद्यांना पाठीशी घालणार? तेव्हा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा दबावतंत्राचा वापर सुरू करण्यासाठी भारतालाच पुढाकार घ्यावा लागेल. या दहशतवाद्यांचा खात्मा झाला नाही तर साऱया जगात हे दहशतवादी कोणत्याही थराला जातील. त्यामुळे सर्वात प्रथम या हाफिज सईदची वळकटी उचलण्याची गरज आहे. हे काम वेळीच केले नाही तर केवळ भारतालाच नव्हे तर पाकिस्तानलादेखील तो तापदायक ठरेल. पाकिस्तान सरकार हाफिज सईदला घाबरते. त्यामुळेच त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यास हा देश तयार नाही. जागतिक नकाशावर पाकिस्तानची प्रतिमा दहशतवादी राष्ट्र बनण्यास हाफिजचे योगदान फार मोठे आहे. पाकिस्तानची वाटचाल अत्यंत चुकीच्या दिशेने चालू आहे. त्या देशातील अंतर्गत प्रश्न जटिल आहेत. ते सोडविण्याऐवजी साऱया जगात  दहशतवाद फैलावण्यासाठी या देशाचे सरकार दहशतवाद्यांना खतपाणी घालण्याचे जे काम करत आहे हा प्रकारच निंदाजनक आहे.

 

Related posts: