|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » पुजारा-विजयची दमदार शतके, भारत 2/302

पुजारा-विजयची दमदार शतके, भारत 2/302 

वृत्तसंस्था /नागपूर :

आठ महिन्यांनंतर कसोटीत पुनरागमन करणारा सलामीवीर मुरली विजय (221 चेंडूत 11 चौकार व एका षटकारासह 128) व रनमशिन चेतेश्वर पुजारा (नाबाद 121) यांच्या धमाकेदार द्विशतकी भागीदारीच्या बळावर यजमान भारतीय संघाने लंकन संघाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱया दिवसअखेर 2 बाद 312 अशी भक्कम धावसंख्या उभारली व एकूण 107 धावांची उत्तम आघाडी देखील प्राप्त केली. शनिवारी दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी पुजारा 284 चेंडूत 13 चौकारांसह 121 तर कर्णधार विराट कोहली 70 चेंडूत 6 चौकारांसह 54 धावांवर नाबाद राहिले.

पुजारा व विजय यांनी दुसऱया गडय़ासाठी 209 धावांची अभेद्य भागीदारी साकारली आणि हेच दिवसभराच्या खेळातील ठळक वैशिष्टय़ही ठरले. या आघाडीच्या बळावर भारताने पहिल्या डावात 205 धावा जमवणाऱया लंकेविरुद्ध दमदार शतकी आघाडी मिळवली. पुजाराने कारकिर्दीतील 14 वे शतक साजरे केले. त्याला समयोचित साथ देणारा विराट कोहली (नाबाद 54) देखील उत्तम फॉर्ममध्ये दिसून आला आणि आज लढतीच्या चौथ्या दिवशी तो आणखी आक्रमक फलंदाजी शैलीत दिसून आला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल. पुजाराने येथे 246 चेंडूत आपले शतक साजरे केले.

येथील खेळपट्टी गोलंदाजीला अगदी प्रतिकूल असताना भारतीय फलंदाजांनी याचा पुरेपूर लाभ घेत जणू येथे धावांचे नंदनवनच प्रत्यक्षात उतरवले. अर्थात, धावांची आतषबाजी करताना त्यांनी अनाठायी धोके स्वीकारले नाहीत, हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरले. पुजारा-विजय ही जोडी विशेषतः कसोटीत भारतात प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी नेहमी कर्दनकाळच ठरत आली असून शनिवारचा दिवस देखील त्याला अपवाद नव्हता. या जोडीची ही कसोटीतील 10 वी शतकी भागीदारीही ठरली. विजयने रंगना हेराथला स्वीप करण्याच्या प्रयत्नात तंबूचा रस्ता धरण्यापूर्वी 221 चेंडूत 11 चौकार व 1 षटकार फटकावले.

पुजाराच्या वर्षात 1 हजार धावा

सौराष्ट्राच्या पुजाराने येथे 2017 सालातील 1 हजार कसोटी धावांचा टप्पा पार केला. शिवाय, पुजारा-विजय या जोडीने सर्व भारतीय जोडय़ांमध्ये 73 अशी सर्वोच्च सरासरीही नोंदवली. याशिवाय, या जोडीने सलग चौथी शतकी भागीदारी देखील फलकावर लावली. मुरली विजयने प्रारंभी आकर्षक स्क्वेअर ड्राईव्हवर सुरंगा लकमलचे (0/58) स्वागत केले आणि तोच धमाका नंतर कायम राखला. लंकन गोलंदाजांनी त्याला ऑफस्टम्पच्या बाहेर लूज व्हॉलीज दिल्या आणि त्यानेही याचा पुरेपूर लाभ घेण्यात अजिबात कसर सोडली नाही. दसून शनाकाच्या एका चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह लगावत त्याने थाटात आपले अर्धशतकही साजरे केले. भारताने दिवसातील तिन्ही हंगामात अतिशय आक्रमक फलंदाजी साकारत 301 धावांची आतषबाजी केली.

Related posts: