|Thursday, December 13, 2018
You are here: Home » क्रिडा » हाँगकाँग ओपनमध्ये सिंधू अंतिम फेरीत

हाँगकाँग ओपनमध्ये सिंधू अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था/कोवलून :

भारताची स्टार बॅडमिंटनपटू व ऑलिम्पिक रौप्यजेत्या पीव्ही सिंधूने विजयी धडाका कायम ठेवताना हाँगकाँग ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य लढतीत सिंधूने थायलंडच्या रेचनॉक इंटेनॉनवर एकतर्फी विजय मिळवला. जेतेपदासाठी सिंधूसमोर आज अग्रमानांकित चिनी तैपेईच्या तेई तेजु यिंगचे आव्हान असेल.

शनिवारी कोवलून येथील वेस्ले बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या उपांत्य लढतीत जागतिक क्रमवारीत तिसऱया स्थानी असलेल्या सिंधूने इंटेनॉनला 21-17, 21-17 असा दणका दिला. 43 मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूने प्रारंभापासून आक्रमक खेळ करताना इंटेनॉनला जरही वरचढ होण्याची संधी दिली नाही. दुसऱया उपांत्य लढतीत अग्रमानांकित चिनी तैपेईच्या तेई तेजु यिंगने कोरियाच्या सुंग जी हय़ूनला 21-9, 18-21, 21-7 असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली. आज जेतेपदासाठी सिंधूसमोर तेईचे आव्हान असणार आहे.

पहिल्या गेममध्ये सिंधूने आश्वासक सुरुवात करताना 6-3 अशी आघाडी मिळवली होती. यानंतर, नेटजवळ आक्रमक व सुरेख खेळ साकारत तिने 15-9 अशी आघाडी घेतली. इंटेनॉनने काही गुण मिळवत तिला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण अनुभवी सिंधूने आघाडी कायम ठेवत पहिला गेम 21-17 असा खिशात घातला. दुसऱया गेममध्येही वर्ल्ड नंबर 5 इंटेनॉने सिंधूला चांगलीच टक्कर दिली. पण, सुरुवातीपासून आघाडी घेतलेल्या सिंधूने शेवटपर्यंत वर्चस्व कायम ठेवत हा गेम 21-17 असा जिंकताना अंतिम फेरीत धडक मारली.

आज होणाऱया अंतिम फेरीत सिंधूसमोर जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या तेई तेजु यिंगचे आव्हान असणार आहे. सिंधूचे आतापर्यंतची तेईविरुद्ध कामगिरी फारशी चांगली नाही. हाँगकाँग ओपनमध्ये मात्र तेईविरुद्ध सरस कामगिरी करत जेतेपद मिळवण्याचा सिंधूचा प्रयत्न असेल. उपांत्य लढतीतील सिंधूच्या या कामगिरीचे प्रशिक्षक गोपीचंद यांनी अभिनंदन केले.

Related posts: