|Saturday, January 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पापाचा वाटा

पापाचा वाटा 

नारद आणि दरेडेखोर वाल्याची गोष्ट समाजात प्रचंड लोकप्रिय आहे. वाल्या नावाचा दरोडेखोर लोकांची संपत्ती लुबाडायचा. प्रसंगी त्यासाठी त्यांच्यावर हल्ला करायचा. एकदिवस त्याचा सामना नारदाशी झाला. नारदाने हे पाप तु का करतोस असा त्याला प्रश्न केला. तेव्हा हे पाप मी माझ्या बायको, मुलांना जगवण्यासाठी करतो असे त्याने उत्तर दिले. मग, तुझ्या या पापात तुझे नातेवाईक सहभागी आहेत का? असा प्रश्न नारदानी केला. पण, वाल्याच्या कुटुंबियांनी त्या पापाचा वाटा उचलायला नकार दिला. लोकांना मारण्याचे पाप तू केले आहेत. त्यामुळे त्याचा वाटा तूच उचल असे त्यांनी सांगितले. पुढे आपल्या कृत्याने पश्चाताप झालेल्या वाल्याचा महर्षि वाल्मिकी झाला! भारतीय संस्कृतीत चांगल्या आचरणासाठी सांगितली जाणारी ही कथा आता सांगण्याचे कारण आहे क्रूरकर्मा दाऊद इब्राहीम. मुंबईत साखळी बॉम्ब स्फोट घडवून आणि अंमली पदार्थांची जगभर तस्करी करून लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेल्या दाऊदच्या घरालाही अखेर सुरूंग लागला आहे. त्याचा 31 वर्षांचा मुलगा मोईन नवाज कासकर हा त्याच्या गुन्हेगारी जगताची सुत्रे स्विकारणे टाळून मौलवी बनला आहे. दाऊदचा बंगला, सर्व वैभव त्यागून तो कराचीतील एका मशिदीत रहायला गेला आहे. मशिदीत मुलांना कुराण शिकवण्याचे काम तो करतो. तिथे देऊ केलेल्या एका खोलीत तो पत्नी आणि तीन मुलांसह राहतो. आपल्या पित्याने केलेल्या कृष्णकृत्यामुळे लाखो लोकांना त्रास झाला आहे, याचे त्याला वाईट वाटते आणि म्हणूनच त्याने त्याचे घर सोडले. दाऊदच्या काळय़ा साम्राज्याची सावलीही आपल्या परिवारावर पडू नये असे त्याला वाटते आणि त्यामुळेच जवळचे जवळपास सर्व नातेवाईक गमावलेल्या दाऊदला मरण्यापूर्वी आपल्या या काळय़ा साम्राज्याचा वारस कोणाला करायचा याची चिंता लागलेली आहे. अर्थात ही सगळी माहिती पोलिसांच्या झरोक्यातून वाहून बाहेर आलेली आहे आणि ती त्यांच्या कानावर घातली आहे ती दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याने. एका बिल्डरला पैशासाठी धमकावल्याच्या प्रकरणात पोलीस अधिकाऱयांनी सप्टेंबर महिन्यामध्ये इकबालला अटक केली होती. सध्या त्याच्याकडे दाऊद विषयीची माहिती जाणून घेतली जात आहे. त्यातून अनेक प्रकारचे खुलासे होत असून त्यातीलच एक खुलासा हा दाऊदच्या मुलाने त्याच्या पापात वाटेकरी न होण्याचा निर्णय घेतल्याबाबतचा आहे. अर्थात ही माहिती खरी किंवा खोटी याची खातरजमा करण्यास सध्या तरी कोणताही मार्ग नाही. पोलिसांना जशी माहिती मिळाली तशीच ती बाहेर आली आहे. पण, त्यामुळे समाजात मात्र नक्कीच पाप, पुण्याची चर्चा सुरू होण्यास मदत होणार आहे. कथा, दंतकथा, मिथके, पुराणे यांच्यातून समाजात प्रवाहीत होणारा विचार हा बऱयाचअंशी मानवतावादाचा विचार असतो. पाप-पुण्य या कल्पना जरी धार्मिक अथवा आध्यात्मिक मानल्या असल्या तरी त्या जगातील बहुतांश मनांवर प्रभाव टाकणाऱया असतात. पण, दाऊदच्या बाबतीत भारतभर त्यातही महाराष्ट्रात जी तिरस्काराची भावना आहे ती मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, फिल्म इंडस्ट्रीतील मंडळी, बिल्डरांचे भर रस्त्यात मुडदे पाडले गेल्याने आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमुळे आहे. पण, लोकांमध्ये याबद्दल तिरस्कार असणे आणि मुलामध्ये असणे यात बरेच अंतर आहे. मुलाने बापाच्या जितेपणी त्याच्या पापाचा पाढा वाचावा आणि तुझ्या दुष्कृत्यातून मिळालेल्या वैभवात अडकून न पडता मौलवी बनतो म्हणून परिवारासह घराबाहेर पडावे हा नियतीचा न्याय दाऊदसारख्या क्रूरकर्म्यावर किती प्रभाव पाडेल हे सांगता येणार नाही. मात्र यापूर्वी जाहीर झालेल्या माहितीनुसार जर दाऊद विकलांग झाला असेल तर त्याचे मानसिक खच्चीकरण तरी यातून नक्कीच होईल. अर्थात त्यामुळे त्याच्या पापाची तीव्रता त्यामुळे कमी होणार नाही. मात्र कोणताही दोष नसताना त्याच्या कृत्यात बळी ठरलेल्यांच्या परिवाराला या गोष्टी नक्कीच सुखावतील. मुंबईत अचानक झालेल्या बॉम्बस्फोटात ज्यांनी जीव गमावले त्यांच्या परिवाराला झालेले दुःख आणि त्यांच्या परिवाराची झालेली हानी कशानेही भरून येणार नाही. मात्र इतकी दोन तपानंतरही दाऊदला भारतात आणून त्याच्या कृत्याबद्दल शिक्षा होत नाही याचा संताप त्या परिवारांना आहे. आता कुठे त्यातील काही परिवार सावरले असतील, काही काळाच्या क्रूर वरवंटय़ाखाली पिसलेही गेले असतील. काही तसेच रखड, खडत जिणे जगत असतील. काहींच्या मृतदेहाचाही शोध न लागल्याने त्यांच्यावरील बेपत्तापणाचा शिक्का पुसलेलाही नसेल. त्या सर्व परिवारांचे दुःख हे डोंगरापेक्षा मोठे आहे. स्वतःला कर्दनकाळ समजून ज्याने या सर्वांच्या संसाराची विल्हेवाट लावली, देशाबाहेरून टोळय़ा चालवून देशाला आव्हान दिले त्याला खेचून भारतात आणणे आपणास शक्य झालेले नाही याचे शल्य प्रत्येक भारतीयाला आहे. पण, त्याच्या पापाचा पाढा त्याच्या समोरच त्याच्याच रक्ताने वाचला आणि त्याच्याशी असलेले नाते, संबंध तोडून तो बाजुला झाला असेल तर हा न्याय देखिल काही हलका नाही. पोलीस यंत्रणेच्या पोलादी कोठडय़ांमधून या सुरस कथेचा वारा लोकांच्यापर्यंत पोहोचला आहे. पापाचा वाटा उचलायला मुलगा तयार नाही. पण, आपल्याच कृत्याचे मढे म्हणून पाकिस्तान सरकार दाऊदचे अर्धमेले मढे प्रदीर्घकाळ वागवत आहे. अशा मन मेल्या अवस्थेतल्या दाऊदला पाकिस्तान अजून किती काळ सांभाळणार असा प्रश्न आहे.

Related posts: