|Monday, December 17, 2018
You are here: Home » मनोरंजन » प्रेमाचा नवा रंग राधा प्रेम रंगी रंगली

प्रेमाचा नवा रंग राधा प्रेम रंगी रंगली 

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. आयुष्यात प्रत्येकाला एकदा तरी प्रेमात पडावं असं वाटतंच. प्रेमाचं स्थान प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ असतं पण तरीही प्रेमाचा रंग प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. काहींना त्यांचं प्रेम पहिल्या भेटीतचं गवसतं तर काहींना हुलकावणी देतं. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकांची कथा आपण आजवर अनेकवेळा बघितली आहे पण ’राधा प्रेम रंगी रंगली‘ या मालिकेच्या माध्यमातून अपघाताने लग्नबंधनात अडकलेल्या प्रेम आणि राधाची कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एकासाठी लग्न म्हणजे केवळ एक व्यवहार आहे आणि दुसऱयासाठी लग्न म्हणजे संसार! कसा रंगेल या प्रेमकहाणीचा करार ? युफोरिया प्रॉडक्शन्स निर्मित प्रेम रंगात रंगणार्या राधेची कथा, राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका शुक्रवारपासून सोमवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता  कलर्स मराठीवर भेटीला येत आहे.

 महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री कविता लाड-मेढेकर, शैलेश दातार, सचित पाटील, वीणा जगताप, अक्षया गुरव, निरंजन नामजोशी, गौतम जोगळेकर, ऋग्वेदी प्रधान, अपर्णा अपराजीत मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहेत. राधा ही आजची कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे जिचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. तर प्रेम व्यवहारचातुर्याने वागणारा, वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळणारा आणि ज्याचं लग्न, कुटुंब, प्रेमं याच्यावर मुळीच विश्वास नाही असा मुलगा आहे. अशी दोन परस्परविरोधी स्वभावाची ही दोन पात्र लग्नबंधनामध्ये अडकतात आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. आता हे लग्न त्यांना का करावे लागले? कुठल्या परिस्थितीत हे लग्न झाले? या सगळय़ा निरुत्तरित प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

 या मालिकेच्या निमित्ताने व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी व्हायाकॉम – 18 चे निखिल साने म्हणाले, कलर्स मराठीद्वारे प्रेक्षकांना वेगळय़ा धाटणीच्या गोष्टी सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे, घाडगे ऍण्ड सून मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. आता आम्ही प्रेक्षकांसमोर राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका घेऊन येत आहोत. मालिकेच्या शीर्षक गीताचे दिग्दर्शन राजेश मापुसकर यांनी केले जे अत्यंत फ्रेश, कलरफुल आणि युथफुल आहे. मालिकेचे दिग्दर्शन वीरेंद्र प्रधान करणार आहेत. आघाडीचे कलाकार आणि वेगळा विषय यामुळे आम्हाला खात्री आहे ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 

 कलर्स मराठीचे क्रिएटीव डिरेक्टर आणि मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान म्हणाले, राधा प्रेम रंगी रंगली ही मालिका माझ्यासाठी दिग्दर्शक म्हणून जास्त आनंद देणारी आहे. प्रेम आणि राधाची ही प्रेम कहाणी वास्तवदर्शी असून अत्यंत लव्हेबल अशी शूट होतोय याचा मला जास्त आनंद होतोय.

Related posts: