|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अत्याचारप्रकरणी तरुणाला अटक

अत्याचारप्रकरणी तरुणाला अटक 

पीडित मुलीचे नातेवाईक रात्रभर तिष्ठत, तीव्र प्रतिक्रिया

वार्ताहर / दोडामार्ग:

घरात कोणी नसल्याची संधी साधून आठवर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सुशिल गोविंद परब (45) याला रविवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर भादंवि कलम 354 (8) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत दिली होती. दरम्यान, तक्रारी देण्यास आलेले पीडित मुलीच्या नातेवाईकांना पहाटे तीनपर्यंत पोलीस ठाण्यात तिष्ठत ठेवल्याने पोलिसांच्या कारभारावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पीडित अल्पवयीन मुलीचे आई-वडील खासगी कामास गेल्याने सदरची मुलगी आपल्या घरी एकटीच खेळत होती. संशयित सुशिल परब याने सायंकाळी तिच्या घरी येऊन तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर तिच्या घरात शिरून तिच्याशी लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली. संशयिताने तिच्या शरीराचा चावाही घेतल्याच्या खुणा आहेत. संध्याकाळी मुलीची आई घरी आल्यावर तिने मुलीकडे अंगावरील जखमांबाबत विचारणा केली. तेव्हा तिने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर लागलीच पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरोधात तक्रार देण्यात आली. संशयित सुशिल परब याला रविवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. अशा नराधमास कडक शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

पीडित मुलीचे नातेवाईक रात्रभर तिष्ठत

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री तक्रार दिल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यातच थांबावे लागले. त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. रात्री 8.30 ते पहाटे 3 वाजेपर्यंत पीडितेचे नातेवाईक पोलीस ठाण्यात होते. वास्तविक अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल तात्काळ घेणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता पहाटेपर्यंत गुन्हा दाखल करण्यास वेळ लागल्याने नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.

 

Related posts: