|Saturday, August 24, 2019
You are here: Home » क्रिडा » जय बिस्ता, सिध्देश लाडची शतके

जय बिस्ता, सिध्देश लाडची शतके 

रणजी लढत : दुसऱया दिवसअखेरीस मुंबईच्या 8 बाद 421 धावा, कर्णधार मुरासिंगचे 5 बळी

वृत्तसंस्था/ मुंबई

येथे सुरु असलेल्या रणजी चषक स्पर्धेत जय बिस्ता (123) व सिध्देश लाड (123) यांच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या डावात दुसऱया दिवसअखेरीस 111 षटकांत 8 बाद 421 धावा केल्या. खेळ संपला तेव्हा धवल कुलकर्णी 50 व मिनाद मांजरेकर 8 धावांवर खेळत होते. मुंबईकडे आता 226 धावांची आघाडी आहे.

तत्पूर्वी, मुंबईने 3 बाद 77 धावसंख्येवरुन दुसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. डावातील पहिल्याच चेंडूवर कर्ष कोठारीला मुरासिंगने बाद करत मुंबईला चौथा धक्का दिला. यानंतर, जय बिस्ता व सिध्देश लाडने पाचव्या गडय़ासाठी 146 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. जय बिस्ताने दुसरे शतक साजरे करताना 136 चेंडूत 17 चौकारासह 123 धावा फटकावल्या. शतक झाल्यानंतर मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात बिस्ता मुरासिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर, सिध्देश लाड व कर्णधार तरेने सहाव्या गडय़ासाठी 97 धावांची भागीदारी साकारत संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. बिस्तापाठोपाठ लाडनेही शतक झळकावताना 197 चेंडूत 123 धावा फटकावल्या. तरेने 9 चौकारासह 67 धावांची खेळी साकारत त्याला चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर धवल कुलकर्णीने 60 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारासह नाबाद 50 धावा फटकावत संघाला चारशेपर्यंत मजल मारुन दिली.

दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईने 111 षटकांत 8 बाद 421 धावापर्यंत मजल मारली होती. धवल 50 व मिनाद मांजरेकर 8 धावांवर खेळत होते. त्रिपुरातर्फे कर्णधार मुरासिंगने 71 धावांत 5 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : त्रिपुरा प.डाव 195, मुंबई पहिला डाव 111 षटकांत 8 बाद 421 (जय बिस्ता 123, सिध्देश लाड 123, आदित्य तरे 67, धवल कुलकर्णी खेळत आहे 50, मिनाद मांजरेकर खेळत आहे 8, मुरासिंग 5/71, राणा दत्ता 1/64).

 

इतर सामन्यांचे निकाल –

  1. बंगाल 379 वि गोवा 191/5
  2. हरियाणा 208 वि केरळ 203/3
  3. दिल्ली 415 वि हैदराबाद 194/8
  4. गुजरात 411 वि झारखंड 98/3

5 पंजाब 645/6 घोषित वि सेनादल 130/4

  1. कर्नाटक 434 वि रेल्वे 241/4
  2. सौराष्ट्र 534 वि राजस्थान 60/2
  3. हिमाचल प्रदेश 353 वि विदर्भ 237/0