ऋतुराजच्या शतकानंतरही महाराष्ट्र बॅकफूटवरच

दुसऱया डावात आसामच्या 3 बाद 101 धावा, महाराष्ट्रावर 127 धावांची आघाडी
पुणे / प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतर महाराष्ट्राचा पहिला डाव 253 डावांत संपुष्टात आला असून या सामन्यात देखील महाराष्ट्र बॅकफूटवर गेला आहे. आजच्या दिवसआखेर आसामने दुसऱया डावात 3 बाद 101 धावा काढत महाराष्ट्रावर 127 धावांची आघाडी घेतली असून अद्याप त्यांचे 7 फलंदाज खेळणे बाकी आहे.
अखेरच्या रणजी सामन्यात आसामला 279 धावांत रोखल्यानंतर महाराष्ट्राला चांगली फलंदाजी करून आसामवर मोठी आघाडी मिळविण्याची संधी होती. मात्र, आसामच्या गोलंदाजांनी महाराष्ट्राच्या डावाला सुरूंग लावत 253 धावांतच डाव संपुष्टात आणला. आसमच्या राहुल सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत 14.2 षटकांत 63 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. तर पी.एल.दास आणि पी.पी. दास यांनी प्रत्येकी 2 गडी व ए.के. दास आणि रजत खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. यामुळे महाराष्ट्राचा डाव 253 धावांत संपुष्टात येऊन पहिल्या डावात आसामने 26 धावांची आघाडी घेतली. महाराष्ट्राकडून ऋतुराज गायकवाडने एक बाजू लावून धरत 210 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 126 धावा केल्या. परंतु दुसरीकडून ऋतुराजला कोणाचीच म्हणावी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा डाव 253 धावांत संपुष्टात आला.
आजच्या दुसऱया दिवसआखेर आसामने आपल्या दुसऱया डावात 3 बाद 101 धावा करत महाराष्ट्रावर 127 धावांची आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राचे रणजीच्या या मोसमातील आशा या आधीच संपुष्टात आल्या आहेत. तरी हा सामना जिंकून महाराष्ट्र मोसमाचा शेवटतरी गोड करेल अशी चहत्यांना आशा आहे.