|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नगरसेवक बाळू खंदारेवर खंडणीचा गुन्हा दाखल

नगरसेवक बाळू खंदारेवर खंडणीचा गुन्हा दाखल 

प्रतिनिधी/ सातारा

मोक्काअंतर्गत अटकेत असलेल्या प्रमोद उर्फ खंडय़ा धाराशिवकरवर आणखी एक सावकारी, खंडणी, जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्हय़ात एकूण 11 साथीदारांमध्ये सातारा नगरपालिकेतील नगरसेवक बाळू खंदारे याचा सहभाग असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बाळू खंदारे याने संबंधिताला चारभिंतीकडे नेवून पिस्टल दाखवून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी साताऱयातील चालकाने तक्रार दिली आहे.

खंडय़ा नाना धाराशिवकर, शंकुतला बाळासाहेब धाराशिवकर, कुबडय़ा उर्फ अमित अशोक कुरणे, नगरसेवक बाळू खंदारे, अमोल देशमुख, जमीर पठाण, अमिर शेख, योगेश लांडगे व अनोळखी 3 (सर्व रा.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बाजीराव शहाजी जगदाळे (वय 48, रा.आनंदनगर, संभाजीनगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार जगदाळे हे चालक असून त्यांची दोन वाहने आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 ऑगस्ट 2013 ते 25 नोव्हेबर 2017 या कालावधीत ही घटना घडली आहे. यातील तक्रार यांच्याकडे दोन टेंम्पो असून ते कर्जाद्वारे हप्त्याने काढला आहे. कर्ज फेडण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने ते खंडय़ा धाराशिवकरला भेटले. सुमारे तीन टप्प्यात तक्रारदार यांनी खंडय़ाकडून 2 लाख रुपये 15 टक्के व्याजाने घेतले. सुरुवातीला ठरलेल्या व्याजाच्या रकमेप्रमाणे तक्रारदार खंडय़ाला पैसे देत होते. एक-दोनदा हप्ते देण्यास वेळ झाल्याने खंडय़ाने दंडासह हप्ते घेतले. अशाप्रकारे तक्रारदार यांनी व्याजापोटी घेतलेल्या 2 लाख रुपयांच्या मोबदल्यात तब्बल 9 लाख 61 हजार रुपये दिले.

व्याजाने घेतलेले सर्व पैसे दिल्यानंतरही संशयित खंडय़ा धाराशिवकर हा त्याच्या टोळीबरोबर रात्री, अपरात्री घरात घुसून ‘राहिलेले पैसे दे’, असा तगादा लावायचा. यावेळी संशयित घरात नको त्या भाषेत बोलायचे. अखेर एकदा 1 लाख रुपये देण्यासाठी गेल्यानंतर खंडय़ाने त्यावेळी पैसे व दुचाकी जबरदस्तीने ठेवून घेतली. संशयितांनी जबरदस्तीने कारमध्ये घालून चारभिंती परिसरात नेले. त्यावेळी बाळू खंदारे याने त्याच्या कंबरेला खोचलेली बंदूक दाखवत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संशयितांकडून सावकारी प्रकरणात वारंवार त्रास होत असल्याने अखेर बाजीराव जगदाळे यांनी शनिवारी रात्री सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

बाळू खंदारे दुसरा नगरसेवक..

सावकारी प्रकरणाने सातारा जिल्हा अक्षरश: हादरुन गेला आहे. सर्वसामान्यांपासून शिक्षक, प्राध्यापक लोकांनाही खंडय़ाने सावकारी माध्यमातून पैसे दिले आहे. व्याजाने दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी खंडय़ाने टोळीच्या माध्यमातून अक्षरश: धुडगूस घातला आहे. आतापर्यंत त्याच्यासह टोळीवर दाखल झालेल्या तक्रारीवरुन समोर आले आहे. सातारा शहराप्रमाणेच फलटण येथेही सावकारीचा उच्छाद घातला आहे. याचप्रकरणातून नगरसेवक सनी अहिवळे याच्यावरही गुन्हा दाखल झालेला असून त्याला मोक्काही लावण्यात आला आहे. दरम्यान, शनिवारी साताऱयातील नगरसेवक बाळू खंदारे याच्यावरही सावकारीचा गुन्हा दाखल झाल्याने सावकारी प्रकरणात हा दुसरा नगरसेवक असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.