|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन

साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे संवर्धन 

बेळगुंदी मराठी साहित्य संमेलनाच्या शामीयान्याची उत्साही वातावरणात मुहूर्तमेढ

वार्ताहर / किणये

मराठी भाषेत बरेच सामर्थ्य असून ही जगातील सर्वश्रे÷ भाषा आहे. मराठी भाषेचे संवर्धन साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होत असते. याकरिता ग्रामीण भागातील प्रत्येक गावात मराठी साहित्याची पारायणे झाली पाहिजेत, असे उद्गार किणये येथील समरसेन पाटील यांनी बेळगुंदी येथे काढले.

बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने बाराव्या बेळगुंदी मराठी साहित्य संमेलनाच्या शामीयानाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम रविवारी मरगाई देवस्थान परिसरात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगुंदी ग्रामस्थ कमिटीचे अध्यक्ष सोमाण्णा गावडा हे होते.

क्ती, समाज व राष्ट्राच्या जडणघडणीत साहित्य व ग्रंथालयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामीण भागातील जनतेला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व इतर क्षेत्रातील विविध बाबींची माहिती मिळावी व त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी बेळगुंदी साहित्य संमेलनाच्या वतीने गेल्या अकरा वर्षापासून जागर सुरू आहे, असे मनोगत प्रा. अजित सगरे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.

विविध प्रतिमांचे पूजन

मुहूर्तमेढीचे पूजन व रोपण रवळनाथ मंदिर जिर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष सुभाष हदगल यांच्या हस्ते करण्यात आले. रवळनाथ प्रतिमेचे डॉ. परशराम झंगरुचे, सरस्वती प्रतिमेचे मुकुंद हिंडलगेकर, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे डॉ. नितीन राजगोळकर, काकासाहेब कालेलकर प्रतिमेचे राजाराम कुन्नूरकर, सावित्रीबाई फुले प्रतिमेचे तालुका पंचायत सदस्या गीता ढेकोळकर, संत तुकाराम महाराज फोटोचे मालती दातार व संत ज्ञानेश्वर प्रतिमेचे पूजन निवृत्त शिक्षक व्ही. के. कोरडे यांच्या हस्ते झाले.

नामदेव गुरव, डॉ. नारायण पडूळकर, निवृत्त सैनिक शंकर कुन्नूरकर, सयाजी पाटील, फॉरेस्ट कंत्राटदार बाबू भरणकर, रामा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.

पाहुण्यांचा परिचय शिक्षिका आर. व्ही. कोरडे यांनी करून दिला. रवळनाथ अकादमीच्या वतीने पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

मातृभाषेसाठी एक दिवस द्या

बेळगुंदी हे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरचे गावच म्हणावे लागेल. सीमाभागाच्या टोकावर मराठी साहित्य संमेलन भरविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. तरीही ग्रामस्थ व अकादमीच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे आजवर अकरा संमेलने यशस्वी पार पडली आहेत. यंदाच्या होणाऱया संमेलनासाठी गावकऱयांनी पाळणूक करून एक दिवस आपल्या मातृभाषेसाठी द्यावा, असे आवाहन सुभाष हदगल यांनी ग्रामस्थांना केले.

आत्महत्या हा पर्याय नव्हे

प्रत्येक माणसाला अनेक अडचणी आहेत. कठीण परिस्थितीत डगमगून न जाता समस्येवर मात करायला शिकले पाहिजे. कठीण प्रसंग आला तर आत्महत्या हा पर्याय नसतो. माणसाने माणूस म्हणून जगले पाहिजे. संत साहित्याच्या माध्यमातून थोर साधूसंतांनी फार मोठा ठेवा आम्हाला उपलब्ध करून दिला आहे, असे विचार प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना कणकुंबी येथील सुनील चिगुळकर यांनी मांडले.

इवलेसे रोप लावियले द्वारी

‘इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी’ याप्रमाणे बेळगुंदी साहित्य संमेलनाचा वेलू हा गगनापर्यंत जातो आहे, असे विचार मुकुंद हिंडलगेकर यांनी व्यक्त केले. आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. तरुणांना क्यसनापासून दूर करण्यासाठीही समाजात जागृती व्हायला पाहिजे, असेही हिंडलगेकर म्हणाले.

चांगले गुण आत्मसात करा

माणसाने चांगले गुण आत्मसात करायला शिकले पाहिजे. चांगले गुण मिळविण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. तसेच साहित्य चवळीबरोबरच पर्यावरण जागृती व्हायला पाहिजे, असे मनोगत व्ही. के. कोरडे यांनी व्यक्त केले.

प्रारंभी प्राथमिक मराठी शाळेच्या मुलींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.

यावेळी शंकर चौगुले, दामोदर मोरे, कल्लाप्पा कुन्नूरकर, सदानंद शिरोळकर, इकबाल शहापूरवाले, महेश बुरुड, मारुती नाईक, प्रकाश कुरबूर, मल्लाप्पा चौगुले, भाऊराव काकतकर, विलास हुबळीकर, शिवाजी मंडोळकर, विश्वनाथ चव्हाण, रामचंद्र शहापूरकर, आनंद हुबळीकर, नाना कंग्राळकर, नरेश दातार आदींसह सविता हुबळीकर, सुमन नागेनहट्टी, कुसुम आमरोळकर, राधिका दातार, सुधा कंग्राळकर, गंगा कुन्नूरकर, वंदना बाचीकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

सूत्रसंचालन अकादमीचे अध्यक्ष प्रकाश किणयेकर यांनी केले. दि. 10 डिसेंबर रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे.

Related posts: