|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तवंदी घाटात 70 फूट दरीत ट्रक कोसळला

तवंदी घाटात 70 फूट दरीत ट्रक कोसळला 

वार्ताहर/ तवंदी

शेलमहून पुण्याच्या दिशेने जाणाऱया ट्रकचा तवंदी घाटातील पहिल्या वळणावर भीषण अपघात झाल्याची घटना 26 रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडला. या घटनेत चालकाने प्रसंगावधान राखत वाहनातून उडी घेतल्याने तो बचावला आहे. पण दरीत सुमारे 70 फुट खाली कोसळल्याने ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ जखमी चालकाला गांधी रुग्णालयात दाखल केले. परशराम फकीराप्पा डफळी (वय 25, रा. मुरविनहळ्ळी, ता. कुंदगोळ, जि. धारवाड) असे जखमी चालकाचे नाव आहे.

 घटनेविषयी अधिक माहिती अशी, परशराम हा ट्रक क्र. केए 25 सी 6434 मधून शेलमहून साहित्य घेऊन पुण्याच्या दिशेने चालला होता. रविवारी सकाळी 6 च्या सुमारास तो तवंदी घाट परिसरात आला. त्यावेळी वाहनावरील त्याचे नियंत्रण सुटले. त्याचा अंदाज येताच परशरामने प्रसंगावधान राखत ट्रकमधून उडी घेतल्याने जीवितहानी टळली आहे. त्या दरम्यान ट्रक पुढे पहिल्या वळनावरील सुरक्षा कठडे तोडून दरीत सुमारे 70 फुट खोलवर कोसळला.

 या घटनेत सदर ट्रकमध्ये परशराम एकटाच होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सदर ट्रकचे मोठे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच मार्गावरुन जाणाऱया वाहनधारकांनी व नागरिकांनी धाव घेऊन जखमीला तत्काळ गांधी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सदर घटनेची माहिती पुंजलॉईडचे अधिकारी व शहर पोलिसांना कळविली. त्यानुसार आण्णाप्पा खराडे, प्रकाश बामणे व निपाणी पोलिस ठाण्याचे हवालदार एस. एस. चिकोडे व सहकार्यानी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला.

वाहतुकीची कोंडी

सदर अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलीस व पुंजलॉडच्या अधिकाऱयांनी मोठी धावपळ झाल्याचे दिसून आले. यावेळी या मार्गावर मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती. ती दूर करण्यासाठी अन्य वाहनधारकांनी मदत केल्याचे दिसून आले

Related posts: