|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमा आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उद्या गौरव

सीमा आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उद्या गौरव 

तालुका म. ए. समिती, किणये ग्रामस्थांच्यावतीने आयोजन

वार्ताहर/ किणये

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनातील 1956 व 1958 त्याचबरोबर साराबंदी आंदोलनात सहभागी झालेल्या किणये परिसरातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव समारंभ मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता किणये येथील ज्ञानेश्वर सोसायटीच्या ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तालुका म. ए. समिती, किणये भागातील युवक मंडळे व ग्रामस्थांच्यावतीने या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

1956 व 1958 च्या सीमा सत्याग्रहात तसेच साराबंदी आंदोलनात भाग घेऊन अनेकांनी तुरुंगवास भोगला. भाषावार प्रांत रचना झाल्यामुळे सीमाभाग कर्नाटकात डांबला गेला. मराठी भाषिकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात या सीमा सत्याग्रही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आवाज उठविला. यातील बरेच जण आज हयात नाहीत. सीमाप्रश्नाची सोडवणूक हेच ध्येय उराशी बाळगून राहिलेल्या या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करण्याची संकल्पना तालुक्यातील समितीनिष्ठ कार्यकर्त्यांतून, युवक मंडळातून व्यक्त होत आहे.

सीमावासियांना मिळणार स्फूर्ती

सीमा लढय़ासाठी या ज्येष्ठ मंडळींचे योगदान फार मौलिक आहे. गौरव कार्यक्रमात त्यांचे अनुभव, त्यांच्याकडून सध्याच्या पिढीला सीमाप्रश्नाबाबतची अधिक माहिती मिळणार आहे. त्यादृष्टीने या ज्येष्ठ सीमासत्याग्रही कार्यकर्त्यांचा गौरव हा सर्व सीमावासियांना नवी स्फूर्ती देणारा ठरणारा आहे. सीमाप्रश्नाचा खटला अंतिम टप्प्यात आहे. न्यायदेवता सीमावासियांना नक्कीच न्याय देणार आहे. न्यायालयीन लढाईबरोबरच रस्त्यावरील लढाई, आंदोलन आजही सुरू आहेत. सध्या चौथी पिढी या सीमाप्रश्नाच्या लढय़ात सामील झाली आहे.

किणये येथे आयोजित केलेल्या या गौरव समारंभाच्या माध्यमातून सीमाप्रश्नाबाबत अधिक जनजागृती होणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: