|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लॉटरीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

लॉटरीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक 

प्रतिनिधी / बेळगाव

फसवणुकीचे नवनवीन फंडे वापरून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. सध्या कडोली भागात लॉटरीच्या नावाखाली एका युवकाने चक्क लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कडोली ग्राम पंचायतमधील एका गावात लॉटरी विकण्यासाठी एक भामटा आला. त्याने 10 रुपयाला एक लॉटरी व त्यात एक अगरबत्ती असलेला बॉक्स मिळणार, असे सांगितले. त्यामुळे नागरिकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून खरेदीही केली. दरम्यान लॉटरी न लागली तरी अगरबत्तीचे दहा बॉक्स तुम्हाला मिळतील असे आमिष नागरिकांना दाखविले. त्यामुळे काही ग्रामस्थांनी ही लॉटरी घेतली. भामटय़ाने लॉटरी घेतलेल्या प्रत्येकाला एक क्रमांक लिहून दिला होता. या क्रमांकावर तुम्हाला काय लागणार आहे ते  मी उद्या येवून देतो, असे सांगून तो गेला.

तो भामटा परत दुसऱया दिवशी त्याच गावात आला. पहिल्या दिवशी दिलेल्या क्रमांकावर तुम्हाला अमुक वस्तूची लॉटरी लागली आहे, असे सांगून प्रत्येक नागरिकाला एक वस्तू दिली. याचवेळी त्याने नागरिकांना फशी पाडण्यासाठी मोठय़ा वस्तूंचे आमिष दाखविले. मोठी वस्तू हवी असल्यास प्रत्येकी 500 रुपये जमा करावे लागतील, असे त्याने सांगितले. पैसे घेतल्यानंतर तुमच्या वस्तू उद्या देतो असे सांगून भामटय़ाने पलायन केले. दोन दिवसानंतर नागरिकांना आपण फसलो गेलो, याची कल्पना आली. त्यामुळे त्यांनी भामटय़ाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद होता. दरम्यान असे भामटे आल्यास फशी न पडता पोलीस खात्याशी संपर्क साधून त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विश्वासासाठी दाखविले पॅनकार्ड

अचानक आलेल्या या लॉटरीबहाद्दरला कोणच ओळखत नसल्याने काही जणांनी त्याला विचारले की तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? त्यामुळे त्याने तुमचा विश्वास नसेल तर मी माझे पॅनकार्ड दाखवितो, असे सांगितले. पॅनकार्ड देण्यात आले असले तरी ते किती खरे की खोटे याबाबत गावात जोरदार चर्चा सुरु आहे.

Related posts: