आपणच आपल्या जातीचे गुलाम

ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांचे प्रतिपादन
रंगराव बन्ने/ कारदगा
आज आपला देश अनेक जाती-धर्मांनी व्यापलेला आहे. प्रत्येकजण आपापल्या धर्मातील उत्सव, सण मोठय़ा उत्साहाने साजरे करतात. या सणांमागील सर्व जातीबांधव एकत्रीत यावेत हा उद्देश आहे. असे जरी असले तरी आज देशातील माणूस माणसापासून दूर जाताना दिसत आहे. कारण जो तो आपल्या जातीचा गुलाम बनला आहे. आज या सर्व जातींपेक्षा मानवजात ही एकच सर्वश्रेष्ठ आहे याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी केले.
येथील 22 व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. हा कार्यक्रम साहित्य विकास मंडळ कारदगा व ग्रामस्थांतर्फे बी. एस. नाडगे महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता.
खान पुढे म्हणाले, भारतीय जनता संविधान दिन, प्रजासत्ताक दिन यासारखे दिवस पाळते. पण त्यामागील कारणे जाणून घेत नाही. यामुळे आपण भारतीय आहोत का याचा विचार प्रत्येकाने करावा. कारदग्यासारख्या ग्रामीण भागात 22 वर्षे अखंडपणे साहित्याचा जागर केला जात आहे यात संयोजकांचे यश आहे. या संमेलनात कोठेही राजकारण दिसत नाही. संमेलनात साहित्य रसिकांबरोबरच राजकीय लोकांनाही आमंत्रित केले जाते ही अभिमानाची बाब आहे. या कार्यक्रमात राजकीय लोकांनी हजेरी लावून आपले मनोगत व्यक्त करून व्यासपीठ सोडून जाणे योग्य वाटत नाही. संमेलनाचा संपूर्ण आस्वाद त्यांनीही घेतल्यास या कार्यक्रमाचे सार्थक होईल, असे वाटते.
आपण संविधानाचे पालन करतो का
आमच्याकडील साहित्यिक समीक्षक कोणतेही पुस्तक न वाचता भाषण देतात. पण सीमाभागातील राजकीय व्यक्ती या साहित्यिकांची पुस्तके वाचतात हे ऐकून समाधान वाटते. प्रत्येकाने देवाची आराधना, प्रार्थना मनोभावे केली पाहिजे. ते करताना देव माणसात आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसा जन्म आणि मृत्यू अटळ आहे त्यानुसार विचार चांगले असणाराही चिरंतर राहतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी संविधान तयार केले. त्या संविधानाचे आपण पालन करतो का? आम्ही माणूस म्हणून लायक आहोत का? हे प्रत्येकाने तपासले पाहिजे.
कारदग्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवावे
मला महान भारत बनवायचा आहे. जात, धर्म, लिंग, भेद, अंधश्रद्धा यामुळे धर्मात चंगळवाद निर्माण झाला आहे. कपडय़ाच्या तुकडय़ात धर्म शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व सोडून माणूस ही एकच जात आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. तसे झाल्यास देश सुखी व समाधानी होईल. अशा विचारांचे बिज या संमेलनात पेरले जातात ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळेच आपण कारदगावासियांना अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी आग्रह धरत आहोत, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जनता भावंडांप्रमाणे
खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, दरवर्षी न चुकता आपण या संमेलनास येतो. येथील साहित्यिकांची तळमळ पाहून हे संमेलन जिल्हा पातळीपर्यंत भरविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार आहोत. या संमेलनात भाषाभेद नाही. महाराष्ट्रातील लोक आम्हाला भावंडांप्रमाणे आहेत. त्यामुळेच हे संमेलन अजरामर ठरत आहे, असे सांगितले.
वाचन, चिंतन, संवर्धनाची गरज
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी म्हणाले, मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे समाजाची अधोगती होत आहे. ती थांबविण्यासाठी प्रत्येकाने नामवंत साहित्यिकांची पुस्तके वाचणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वाचन, जतन, चिंतन, संवर्धन करणेही गरजेचे आहे, असे सांगितले. माजी आमदार काका पाटील यांनी, सदर संमेलन हे चांगला उद्देश ठेवून आयोजित करण्यात आले आहे. त्याचा आपणास अभिमान असल्याचे सांगितले.
प्रारंभी जंगली महाराज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन, प्राथमिक मराठी मुलांच्या विद्यार्थ्यांनी सुरेश शास्त्राr यांनी संगीतबद्ध केलेले नाडगीत गायिले. यावेळी साहित्यिक, राजकीय, सैनिक व इतर क्षेत्रातील निधन पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खासदार प्रकाश हुक्केरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर श्रीकांत नाईक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
स्वागत ग्रा. पं. अध्यक्षा शिवूबाई गावडे यांनी, तर प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा कल्पना रायजाधव यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आमदार शशिकला जोल्ले, जवाहरचे संचालक बाबासो नोरजे, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक श्रेणिक पाटील, डीकेएसएसकेचे संचालक अजितराव देसाई सरकार, साई उद्योग समुहाचे प्रदीप जाधव, अरिहंत सौहार्दचे संचालक उत्तम पाटील, जि. पं. सदस्या सुमित्रा उगळे, ता. पं. सदस्य दादासो नरगट्टे, एस. एम. माळी, एस. के. माळी, दत्ता खोत, डॉ. बाबासाहेब चौगुले, दाजी पाटील यांच्यासह ग्रा. पं. सदस्य, विविध संघांचे पदाधिकारी, शाळा-महाविद्यालयातील शिक्षक यांच्यासह मोठय़ा संख्येने साहित्यरसिक उपस्थित होते.
ग्रंथ दिंडीतून मायमराठीचा गौरव
साहित्य संमेलनानिमित्त आयोजित ग्रंथ दिंडीतून मायमराठीचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा केली होती. व्यसनमुक्ती, शेतकऱयांच्या समस्या यासह विविध समस्यांचे आकर्षक फलक यावेळी लक्षवेधी ठरले. झांजपथक, लेझिम, भजनी मंडळाच्या टाळ-मृदंगांचा गजर यामुळे कारदगावासिय मंत्रमुग्ध झाले होते. प्रारंभी ग्रा. पं. ज्योतिर्लिंग मंदिराजावळ डी. एस. नाडगे महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एस. बुर्गे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार शशिकला जोल्ले, ग्रा. पं. अध्यक्षा शिवूबाई गावडे, उपाध्यक्ष भरत भागाजे, जवाहरचे संचालक बाबासो नोरजे, उपप्राचार्य एम. ए. घोसरवाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रंथ दिंडीचे पूजन करून गावातील प्रमुख मार्गावरून विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी दिंडी पाहण्यासाठी इमारतींवर व रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती.