|Thursday, December 13, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » माणूस आणि अमरत्व

माणूस आणि अमरत्व 

माणसाला जेव्हा अक्कल आली, तेव्हापासून दोन गोष्टींचा ध्यास होता. यातली पहिली गोष्ट म्हणजे अमरत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीस-लोखंडाचे सोने करणारा दगड. हा जो परीस आहे तो खरं तर माणसाला गेल्या शतकात मिळाला असं आपण म्हणू शकतो. या म्हणण्याचा अर्थ असा की कमी प्रतीच्या मूलद्रव्याचे महागडय़ा मूलद्रव्यात रूपांतर करणे, ही गोष्ट आता शक्मय आहे. फक्त त्या खर्चाचा विचार करून हा उद्योग अजून तरी कुणी हाती घेतलेला नाही. मात्र असाच दुसरा एक उद्योग सफल झालेला आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय आर्थिक उलाढालीवर परिणाम होण्याची शक्मयता घेऊन त्यासंबंधी कडक कायदे पाश्चात्य देशात केलेले आहेत. इ. स. 2005 च्या सुमारास ग्राफाईटचं 5 ते 10 कॅरटच्या हिऱयांमध्ये रूपांतरण करण्यात काही पदार्थ वैज्ञानिकांना यश आलं. या हिऱयावर ‘अननॅचरल’ असं लिहिणं आता बंधनकारक करण्यात आलं. हे हिरे कृत्रिम आहेत, हे ओळखणं पट्टीच्या रत्नपारख्यांना जमलं नाही. आता माणिक आणि पाचू कृत्रिमरित्या तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

अमरत्वाच्या प्रयत्नात माणसाला इ. स. 2050 पर्यंत यश येईल असं म्हटलं जातं. हे अमरत्व दोन प्रकारचं असेल एक म्हणजे माणसाला वृद्धत्व येऊ नये, यासाठी प्रयत्न करणे आणि दुसरं म्हणजे जे अवयव निकामी होतील त्या जागी नव्या अवयवांचं आरोपण करणे. आपल्याकडे माणूस 400 वर्षे जगू शकतो, असा दावा करणारे महाभाग आहेत. तसा हा दावा नाही. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार माणसाचं आयुष्य हळूहळू वाढवत नेता येईल. यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग वेगवेगळय़ा संशोधन संस्था दरवर्षी काही घोषणा करतात. त्या सर्व संशोधनांचे एकत्रिकरण केले, तर माणूस अगदी अमर झाला नाही, तरी 2050 पर्यंत तो बराच दीर्घकाळ जगू शकेल. प्रश्न आहे, तीन-चारशे वर्षे जगून माणूस करणार काय याचा? अशा तऱहेने दीर्घायुष्यी बनणं, हे सर्वांना शक्मय नाही. त्यासाठीचा खर्च आणि नंतरचा देखभालीचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही. याचा अर्थ काही निवडक माणसांचे आयुष्य वाढेल. आजच सामान्य माणसाला वैद्यकीय खर्च परवडेनासा झाला आहे. पुढे तर तो हाताबाहेर जाईल. असं असलं तरी अमरत्वाच्या दिशेनं वाटचालीचे हे मार्ग कोणते, हे बघायला काय हरकत आहे?

अवयवारोपण हा आता आपणा सर्वांना माहीत असलेला एक मार्ग आहे. जीर्ण, नाकाम झालेले अवयव बदलणे, माणसाचे सर्व अवयव बदलता येणं शक्मय आहे, किंबहुना हृदय, फुफ्फूसं, यकृत, मूत्रपिंड, स्वादूपिंड, पित्ताशय असे महत्त्वाचे आणि जगण्याच्या दृष्टीनं आवश्यक असे सर्व अवयव आता बदलले जाऊ शकतात पण त्यासाठी पुरेशा संख्येनं अवयवदाते मिळत नाहीत. त्यासाठी दुसरा कुणीतरी अपघातात मरण्याची वाट बघावी लागते किंवा मग मूत्रपिंडांच्या बाबतीत कुणी जवळची व्यक्ती तिचं एक मूत्रपिंड देते का, हे बघावे लागते. या बाबतीत दोन आशादायक मार्ग समोर आलेले आहेत. एक म्हणजे मूळ पेशीपासून नव्यानं एखादा अवयव प्रयोग शाळेत वाढवून त्याचं प्रत्यारोपण करणे. यासाठी मूल जन्माला येताच त्याच्या नाळेतील मूळपेशी (स्टेमसेल्स) काढून त्या जपून ठेवणे हा एक मार्ग मध्यंतरी पुढे आला होता पण त्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले. शिवाय त्याच्या उपयुक्ततेची कसोटी कोण आणि कधी बघणार हा प्रश्न होता. तरीही अमेरिकेत अनेक ठिकाणी ‘मूळपेशी जतन पेढय़ा’ स्थापन करण्यात आल्या. त्यासाठी काही भाडं आकारलं जाणं, हे साहजिकच आहे. एकंदरीत हा मार्ग खर्चिकच आहे. त्याला म्हणावं तसा प्रतिसादही मिळालेला नाही, हे खरं पण आता आपल्याच शरीरात दात आणि इतर काही ठिकाणी मूळपेशी असतात, असं दिसून आलं आहे. त्याच्यापासून आपण हवे तेव्हा हवा तो अवयव तयार करू शकू असं म्हटलं जातं, त्यादृष्टीने संशोधन चालू आहे.

आपल्याला हवा तो अवयव हवा तेव्हा मिळविण्याचा आणखी एक मार्ग सुचवला जातो. तसा तो सोपा वाटतो मात्र त्यावर एक म्हणजे अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. दुसरं म्हणजे त्याबद्दल मानसशास्त्रीय अडथळे येण्याची एक शक्मयता वर्तवली जाते. आपल्या लहानपणी शाळेत जीवशास्त्राच्या पुस्तकांमध्ये (निदान आमच्यावेळी तरी) माणूस, कपि, मर्कट, आणि डुक्कर यांच्या गर्भांमध्ये पहिला काही काळ तरी कमालीचं साम्य असतं, असंही या आकृतीखालच्या स्पष्टीकरणात म्हटलेलं असे. डुकरांचे अवयव मानवी शरीरास उपयुक्त ठरू शकतील असा शरीरशास्त्रज्ञांनी कयास बांधला असून त्या दृष्टीनेही प्रयोग चालू आहेत.

अवयवारोपण इतर अवयवांच्या बाबतीत सहज शक्मय होईल, असा विश्वास वेळोवेळी व्यक्त केला जातो. मात्र या अवयवांच्या यादीत एक अवयवाचा क्वचितच उल्लेख असतो आणि असलाच तर त्यामुळे प्रश्न चिन्ह असते. हा अवयव म्हणजे मेंदू. मेंदूचं प्रत्यारोपण वाटतं तितकं सोपं नाही, हे त्यामागचं एक कारण असलं तरी त्याही पेक्षा महत्वाचं कारण नैतिक आहे. तत्त्वज्ञानी व्यक्तींनी ‘मी कोण?’ हा प्रश्न बरीच वर्षे चर्चेत ठेवला. या प्रश्नाचं विज्ञानाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलं तरी त्यावर बरीच एकवाक्मयता आहे. आपला मेंदू ‘आपण कोण’ ते ठरवत असतो. एक व्यक्ती दुसऱया व्यक्तीसारखी असू शकत नाही. याचं कारण मेंदू. बोटांचे ठसे, बुब्बुळांची ठेवण, हे आपली शारीरिक ओळख पटवतात. मात्र आपलं व्यक्तिमत्त्व, आपला स्वभाव, आपली विचार करण्याची पद्धत, एवढेच काय तर आपली लैंगिक वाढ आणि वर्तणूक आपला मेंदू नियंत्रित करीत असतो. त्यामुळे आपला मेंदू बदलून त्या जागी दुसऱयाचा मेंदू बसवला तर त्या व्यक्तीची ओळख काय हा प्रश्न निर्माण होतो. शरीर ज्या व्यक्तीचं असेल त्या व्यक्तीची वर्तणूक ही आता पूर्णपणे बदललेली असणार, मुख्य म्हणजे स्मरण आणि अनुभव यात जमीन अस्मानाचं अंतर असणार. या विषयावर बराच खल झालेला आहे. विज्ञान कादंबऱया लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याशिवाय चित्रपटही निघालेले आहेत.

 मानवी मेंदूतल्या सर्व घडामोडी या अतिसूक्ष्म विद्युत प्रवाहांच्या साहाय्यानं घडून येतात, हे आता सर्वज्ञात आहे. यात आपलं स्मरणही आलंच. त्यामुळे मेंदूत जे काय साठवलंय ते संगणकात उतरवणं शक्मय आहे, असं मेंदू आणि इलेक्ट्रॉनिकी यांचा मेळ घालणाऱया शास्त्रज्ञांना वाटतं. हे जर खरंच शक्मय झालं तर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं सार संगणकात साठवता येईल. (या पुढचा भाग आज असंभाव्य वाटेल असा आहे, हे आधीच सांगून ठेवतो.) मग एक तर त्या व्यक्तीच्या मूळपेशींपासून त्याचाच नवा मेंदू वाढवायचा त्यात हे संगणकामधलं अंकीय स्मरण भरायचं. नंतर तो मेंदू जुन्या मेंदूच्या जागी बसवायचा. हे तरी करायचं किंवा त्या माणसाचा क्लोन तयार करायचा आणि त्याच्या मेंदूत हे स्मरण भरायचं. तिसरा पर्याय म्हणजे हा नवा स्मरणयुक्त मेंदू एखाद्या यंत्रमानवात बसवायचा किंवा एखाद्या यंत्रमानवात तो स्मरणयुक्त संगणक बसवायचा. यंत्र मानवाला मानवसदृश बनविण्याचे प्रयत्न तर सध्या सुरू आहेतच. ते बऱयाच प्रमाणात यशस्वीही होत आहेत. अलीकडेच एका इंग्रजी वृत्तपत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर लेख आला होता. त्यात लवकरच हुबेहूब मानवासारखे यंत्रमानव निर्माण केले जातील आणि त्यानंतर जनसामान्यांच्याकडून ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या संकल्पनेचा स्वीकार केला जाईल. हा दिवस आता फार दूर नाही, असा न्यूयॉर्क टाइम्समधला लेख पुनर्मुद्रित करण्यात आला होता.

Related posts: